Congress to trap government in convention; Sonia Gandhi's discussion with party MPs | अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार काँग्रेस; पक्षाच्या खासदारांशी सोनिया गांधींची चर्चा

अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार काँग्रेस; पक्षाच्या खासदारांशी सोनिया गांधींची चर्चा

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे देशात सध्या अनेक उलथापालथी सुरू आहेत. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संसदेचे अधिवेशन बोलाविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या अधिवेशनात मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाच्या खासदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शनिवारी केलेल्या चर्चेतून या गोष्टीचे संकेत मिळाले आहेत.
प्रत्येक काँग्रेस खासदाराच्या मतदारसंघामध्ये कोरोना संसर्गाच्या फैलावाची स्थिती काय आहे याची माहिती सोनिया गांधी यांनी मागविली आहे. कोरोनाची साथ, लॉकडाऊन, भारत-चीनमध्ये पुन्हा उफाळून आलेला सीमातंटा तसेच देशात घडणाऱ्या राजकीय घडामोडी या मुद्यांवर काँग्रेसच्या शनिवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. विविध मुद्द्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस नेते अनेक मुद्दे संसद अधिवेशनात उपस्थित करणार आहेत. काँग्रेसच्या या बैठकीत पक्षाच्या काही खासदारांनी स्थलांतरित मजुरांचे झालेले विलक्षण हाल, वाढती महागाई, असे मुद्देही उपस्थित केले.

सोनिया गांधी म्हणाल्या...
सोनिया गांधी या बैठकीत म्हणाल्या की, विविध समस्यांनी गांजलेल्या गरीबांच्या हातात रोख रक्कम द्यावी या काँग्रेसच्या मागणीकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले आहे. संसदेचे आगामी अधिवेशन सुरू होईपर्यंत व नंतरही या मुद्यावर पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आवाज उठवायचा आहे.

राहुल गांधी म्हणाले...
भारतीय हद्दीमध्ये चीनी लष्कराने घुसखोरी केली हे मोदी सरकारचे मोठे अपयश आहे अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या बैठकीतही केली.
चीनच्या घुसखोरीबाबत मोदी सरकार वारंवार खोटे बोलले असून त्याबद्दल त्याला संसदेत धारेवर धरले पाहिजे असे राहुल गांधी यांनी सांगितले.

पीएम केयर्सचा हिशेब काँग्रेस मागणार
केंद्र सरकारच्या खोटारड्या राजकारणावर जोरदार हल्ला चढवित काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘असत्याग्रही’ या एकाच शब्दातून चिनी सैनिकांची घुसखोरी, सर्वात मोठा विद्युत प्रकल्प, पीएम केयर्स फंड आदी मुद्यांवरुन सरकारवर शाब्दिक बाण डागले आहेत. पीएम केयर्स फंडला देणगी देणाऱ्यांची नावे जाहीर का केली जात नाहीत.

राहुल गांधी यांना पुन्हा पक्षाध्यक्ष करा
राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जावी अशी मागणी बिहारचे खासदार मोहम्मद जावेद यांनी या बैठकीत केली. गोव्यातील काँँग्रेसचे खासदार फ्रान्सिस्को सारदिन्हा यांनी सांगितले की, राहुल गांधी जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने मोदी सरकारशी संघर्ष करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress to trap government in convention; Sonia Gandhi's discussion with party MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.