‘काँग्रेसने अहंकार सोडावा’, INDIAचं नेतृत्व कुणाकडे? विरोधी पक्षांच्या आघाडीत पडले दोन गट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:11 IST2024-12-10T14:10:44+5:302024-12-10T14:11:34+5:30
INDIA Opposition Alliance: इंडिया आघाडीत नेतृत्वावरून सध्या घमासान सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसकडून याला आक्षेप घेण्यात येत आहे.

‘काँग्रेसने अहंकार सोडावा’, INDIAचं नेतृत्व कुणाकडे? विरोधी पक्षांच्या आघाडीत पडले दोन गट
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी उभ्या केलेल्या इंडिया आघाडीने केंद्रातील मोदी सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. तसेच या आघाडीने देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल तामिळनाडू आदी राज्यांत केलेल्या दमदार कामगिरीमुळे भाजपाला लोकसभेत बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं होतं. इंडिया आघाडीला मिळालेल्या या यशाचं सर्वाधिक श्रेय हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिलं गेलं होतं. दरम्यान, आता याच इंडिया आघाडीत नेतृत्वावरून सध्या घमासान सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसकडून याला आक्षेप घेण्यात येत आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांच्यामध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या सर्व घडामोडींबाबत सांगितले की, काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी अपयशी ठरली आहे, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे. जर ममता बॅनर्जी ह्या नेत्या बनल्या तर ती खूप चांगली बाब ठरेल. आघाडीतील सर्वात मोठ्या नेत्या ह्या ममता बॅनर्जी आहेत. राजकीय लढाई कशी लढली जाते, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. काँग्रेसने आपला इगो सोडला पाहिजे. काँग्रेसने आपल्या अहंकारापायीच ममता बॅनर्जी यांना हटवलं होतं.
दरम्यान ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले की, इंडिया आघाडी या मुद्द्यावर चर्चा करत आहे. काँग्रेससोबत आमचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचे लोरसभेत सर्वाधिक खासदार आहेत. मात्र आम्ही अशा व्यक्तीबाबत चर्चा करत आहोत जी व्यक्ती इंडिया आघाडीच्या नेतृत्वाला वेळ देऊ शकेल.
तर लालू प्रसाद यादव यांनीही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची इंडिया आघाडीच्या नेतेपदी निवड केली पाहिजे, असे सांगितले. काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधाला काही अर्थ नाही. ममता बॅनर्जी यांनाच नेता म्हणून नियुक्त केलं पाहिजे, असं सांगितलं. तसेच पुढच्या वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपला पक्ष विजयी होईल असा दावाही केला.
ममता बॅनर्जी यांनी हरयाणा आणि महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या झालेल्या सुमार कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच संधी मिळाल्यास आपण इंडिया आघाडीचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार असल्याचाही दावा केला होता.