"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:22 IST2025-01-28T16:18:54+5:302025-01-28T16:22:29+5:30

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Congress response to Union Minister Jyotiraditya Scindia criticism of Rahul Gandhi | "भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

Congress on Jyotiraditya Scindia: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात इतिहासावरुन शा‍ब्दिक युद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांनी आधी इतिहास वाचावा असं म्हटलं होतं. त्यावर आता काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. मध्यप्रदेशातील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी दलित, मागासलेले आणि आदिवासींना कोणतेही अधिकार नव्हते. त्यावेळी फक्त महाराज आणि राजे यांना अधिकार होते, असं विधान केलं होतं.

इंदौर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यानंतर मध्य प्रदेशात राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 'फक्त महाराजांना अधिकार होते या वक्तव्यावर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी टीका केली होती. आता काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पोस्टवर प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय मंत्री राजघराण्यांचे ब्रिटिशांप्रती असलेले प्रेम विसरले असतील, पण आम्ही विसरू शकत नाही,' अशी टीका काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलं आहे.

सोमवारी महू येथे एका सभेला संबोधित करताना गांधी यांनी, स्वातंत्र्यापूर्वी दलित, मागासलेले लोक आणि आदिवासी यांना कोणतेही अधिकार नव्हते, तेव्हा फक्त महाराज आणि राजे यांना अधिकार होते, असं म्हटलं. स्वातंत्र्यासोबतच बदल झाला. तुम्हाला जमीन आणि हक्क मिळाले. भाजपा-आरएसएसला स्वातंत्र्यपूर्व भारत हवा आहे, जिथे सामान्यांना कोणतेही अधिकार नव्हते आणि फक्त अदानी आणि अंबानी सारख्या लोकांना अधिकार होते. देश अब्जाधीश चालवत असताना गरिबांनी मूकपणे दु:ख भोगावे अशी त्यांची इच्छा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना करताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी, संविधानाला आपली 'पॉकेट डायरी' मानणारे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी भारतातील राजघराण्यांच्या भूमिकेवर दिलेले विधान त्यांची संकुचित विचारसरणी आणि समजूतदारपणा उघड करते असं म्हटलं आहे. ज्योतिरादित्य शिंदे एक्स पोस्टवरुन राहुल गांधींवर निशाणा साधला. 

राहुल गांधींनी आधी इतिहास वाचावा - ज्योतिरादित्य शिंदे

"सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासापोटी या राजघराण्यांनी भारतात समतेचा आणि सर्वसमावेशक विकासाचा पाया वर्षापूर्वी घातला होता, हे ते विसरले आहेत. मागासवर्गीयांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, ग्वाल्हेरच्या माधव महाराज प्रथम यांनी संपूर्ण ग्वाल्हेर-चंबळमध्ये शिक्षण आणि रोजगार केंद्रे उघडली होती. राहुल गांधींनी आधी इतिहास वाचावा मग वक्तव्ये करावीत," असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

यानंतर आता काँग्रेस नेते पवन खेरा यांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. "इतिहास तुमच्याकडे बोट दाखवतो आणि रडतो, महाराज. जर राज्यघटनेची २६वी दुरुस्ती झाली नसती तर आजही ग्वाल्हेर राजघराण्याला (१९५० मध्ये २५,००,०००) भारत सरकारकडून कोट्यवधी रुपये करमुक्त दिले जात होते. भारतातील विलीनीकरणाची ही किंमत तुम्ही ७१ पर्यंत घेत राहिलात. राजघराण्यांनी केलेला विश्वासघात आणि इंग्रजांवरचे त्यांचे प्रेम तुम्ही विसरला असाल, आम्ही सगळे विसरू शकत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येत राजघराण्यातील पिस्तुल वापरण्यात आल्याचा इतिहास साक्षी आहे. अनेक राजघराण्यांच्या कुकर्मांची यादी काही राजांच्या चांगुलपणाने झाकली जाऊ शकत नाही," असं पवन खेरा यांनी म्हटलं.
 

Web Title: Congress response to Union Minister Jyotiraditya Scindia criticism of Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.