काँग्रेस आणणार ‘ब्ल्यूप्रिंट’
By Admin | Updated: January 5, 2015 03:42 IST2015-01-05T03:42:32+5:302015-01-05T03:42:32+5:30
पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या काँगे्रसमध्ये नवा प्राण फुंकणारी ‘ब्ल्यूप्रिंट’ तयार होत असून, ती येत्या मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे़

काँग्रेस आणणार ‘ब्ल्यूप्रिंट’
नवी दिल्ली : पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या काँगे्रसमध्ये नवा प्राण फुंकणारी ‘ब्ल्यूप्रिंट’ तयार होत असून, ती येत्या मार्चपर्यंत येणे अपेक्षित आहे़ नैराश्य दूर सारून पक्षाला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांना दिले आहेत़
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा व ब्लॉक स्तरावरील कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्याचे निर्देश पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडे सर्व पक्ष सरचिटणीसांना दिले होते़यापाठोपाठ काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सर्व पक्ष प्रदेशाध्यक्षांना औपचारिक पत्र लिहिले आहे़ तळागाळातील कार्यकर्त्यांचे विचार, त्यांच्या सूचना जाणून घेऊन फेबु्रवारीअखेरपर्यंत अहवाल सादर करा, असे या पत्रात म्हटले आहे़ काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलेला हिंदू विशेषत: ब्राह्मण समुदाय गत लोकसभा निवडणुकीत भाजपाकडे वळला़ सोबत हिंदी भाषक पट्ट्यातील काँग्रेसचा दलित आणि ओबीसी जनाधारही घटला, असे पक्षनेते मानून चालले आहेत़ या सर्व विषयांवर तळागाळातील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्याचे काँगे्रसचे प्रयत्न आहेत़
लोकसभा आणि पाठोपाठ अनेक राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील पराभवाच्या मालिकेनंतर पक्षाचा जनाधार घसरू लागला आहे़ या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी सर्व राज्यांच्या सुमारे ४०० नेत्यांसोबत चर्चा केली होती़ काँग्रेसने हिंदू मतांवरील पकड पुन्हा मिळवायला हवी, असा एक सूर या नेत्यांनी या चर्चेदरम्यान आळवला होता़ काँग्रेस केवळ अल्पसंख्याकांची बाजू घेते, हिंदू मतांबाबत या पक्षाला काहीही देणे-घेणे नाही, असा संदेश लोकांमध्ये जात असून याचा थेट लाभ भाजपाला होत असल्याचे मत या नेत्यांनी बोलून दाखविले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)