“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:24 IST2025-07-08T18:22:45+5:302025-07-08T18:24:59+5:30
Congress Ramesh Chennithala News: राज ठाकरे हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
Congress Ramesh Chennithala News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात रंगलेल्या मराठी-हिंदी भाषेच्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एन्ट्री झाली आहे. संघाच्या मते देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे आणि प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतले पाहिजे. संघात ही बाब आधीपासून स्पष्ट आहे, असे मत संघाचे अखिल प्रचारप्रमुख भारतीय सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. देशात वेगवेगळ्या भागात राहणारे लोक तेथील आपापली मातृभाषा बोलतात. त्यामुळे मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे, असा आग्रह असतो. मातृभाषेतून शिक्षण ही गोष्ट खूप आधीपासून ठरलेली आहे, असेही आंबेकर यांनी सांगितले. यावरून आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेसकडून टीका केली जात आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही
मराठी हिंदी वाद व निशिकांत दुबेच्या वादग्रस्त वक्तव्यावर रमेश चेन्नीथला दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याच्या प्रश्नावर बोलताना चेन्नीथला म्हणाले की, राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील प्रवेशासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणुकीत एकत्र येण्याबाबत दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी सकारात्मक असल्याचे दिसत असले, तरी राज ठाकरे हे केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबतच युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, निवडणुकीतील घोटाळ्यावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७५ लाख मतदान कसे वाढले, हाच प्रश्न लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. निवडणुक आयोग हा भाजपासाठी काम करत असून निवडणुकीत कूकर्म करून विजय मिळवला आहे. आता बिहारमध्येही तेच सुरु आहे. बिहारमध्ये २ कोटी मतदारांचा प्रश्न आयोगाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे निर्माण झाला आहे आणि आयोग हे सर्व भाजपाला फायदा व्हावा यासाठी करत आहे. निवडणुकांमध्ये पारदर्शकता हवी पण आयोगाची भूमिकाच संशयास्पद आहे. याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागू असेही चेन्नीथला म्हणाले.