Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 14:45 IST2023-01-30T14:44:15+5:302023-01-30T14:45:06+5:30
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान भर बर्फवृष्टीत जनतेला संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: “भाजप नेते घाबरट, जम्मूत यात्रा काढू शकत नाहीत”; भर बर्फवृष्टीत राहुल गांधींचा घणाघात
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. याच ठिकाणी आता भारत जोडो यात्रेची सांगता होत आहे. यावेळी भर बर्फवृष्टी सुरू असताना राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. तर, भाजपचे लोक घाबरट आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.
जर तुम्हाला जगायचे असेल तर तुम्हाला न घाबरता जगायला हवे, हे मी महात्मा गांधीजींकडून शिकलो. मी चार दिवस इथे फिरलो. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिले नाही, तर खूप प्रेम दिले. अगदी कौतुकाने माझे स्वागत केले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच मला वाटले की, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू केलेला पायी प्रवास कठीण नसेल. मात्र, कन्याकुमारी येथून सुरुवात केल्यावर लगेचच माझा गुडघा दुखायला लागला. मात्र, काश्मीरला येईपर्यंत ते दुःख दूर झाले, असे राहुल गांधी म्हणाले.
ही काश्मिरियत आहे का? राहुल गांधींचा थेट सवाल
मी सरकारी घरात राहिलो आहे. कारण माझ्याकडे कधीच घर नव्हते. माझ्यासाठी घर ही संरचना नाही, तर ती जीवन जगण्याची पद्धत आहे. ज्याला तुम्ही काश्मिरियत म्हणता, मी ते घर मानतो. ही काश्मिरियत आहे का? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली. या पृथ्वीवर दोन विचारधारा आहेत, त्यांच्यात वर्षानुवर्षे नाते आहे. त्याला आपण काश्मिरियत म्हणतो, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच महादेव शिवशंकरांची विचारसरणी आणि इस्लाममधील विचारसरणी कशी सारखी आहे, याचे उदाहरणही दिले.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना हिंसेची वेदना समजू शकत नाही
जे लोक हिंसा घडवून आणतात, त्यांना याचे दुःख कधीही समजणार नाही. मात्र, या हिंसेची वेदना मी समजू शकतो. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना समजू शकत नाही. मी समजू शकतो. जेव्हा मी अमेरिकेत होते, तेव्हा मला एक फोन आला आणि त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे, अशी आठवण सांगत, असे फोन जवानांच्या घरी येणे बंद झाले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"