Congress Protest: महागाईमुळे लोकांचे खूप हाल होताय, काहीतरी करा; प्रियंका गांधींची मोदी सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 13:51 IST2022-08-05T13:46:28+5:302022-08-05T13:51:06+5:30
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Congress Protest: महागाईमुळे लोकांचे खूप हाल होताय, काहीतरी करा; प्रियंका गांधींची मोदी सरकारकडे मागणी
नवी दिल्ली- देशातील महागाईविरोधातकाँग्रेसने देशभर निदर्शने सुरू केली आहेत. राजधानी दिल्लीतही काँग्रेसकडूनमहागाईविरोधात निदर्शने सुरू असताना पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ताब्यात घेतले. सध्या काँग्रेसचे अनेक खासदार विजय चौकात आंदोलनासाठी बसले आहेत. राहुल गांधी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढत होते. मात्र पोलिसांनी त्यांना विजय चौकातच रोखले आणि राहुलसह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी काँग्रेसला परवानगी दिली नव्हती. खबरदारी म्हणून सध्या या भागात कलम 144 लागू करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. महागाईमुळे लोकांचे खूप हाल होत आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत असल्याचं प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाजपावर हल्लाबोल केला आहे.
आमच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमच्या खासदारांसोबत गैरवर्तन केले, त्यांना ओढले. काहींना यावेळी पोलिसांनी मारहाणदेखील केली. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्व पाहत आहात. महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, पण केंद्र सरकार आम्हाला आंदोलन करू देत नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्वच नेते निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'देशातील महागाई अनियंत्रित झाली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत.' त्याचवेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'हा विरोध महागाई आणि अग्निपथबाबत आहे. महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. राजकीय पक्ष असल्याने जनतेचा आवाज बुलंद करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत.
फक्त जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी-
दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. माहितीसोबतच इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे.