लुनावाडा (गुजरात) : पाटीदारांना आरक्षण देण्याची काँग्रेसची घोषणा फसवी आहे. या आधी मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करीत असे, पण त्यांनाही आरक्षण दिले नाही, असे सांगत नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये काँग्रेस जातींचे राजकारण खेळत असल्याचा आरोप केला.पंतप्रधान म्हणाले की, पाटीदार समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुसूचित जाती, जमाती किंवा ओबीसी यांचा हिस्सा हिसकावून घ्यावा लागेल, ते करणे अशक्य आहे. त्यामुळे काँग्रेसचे आताचे आश्वासनच खोटे आहे, ते पाटीदारांना आरक्षण देणारच नाहीत. काही राज्यांत मुस्लिमांनाही काँग्रेसने असेच आरक्षणाचे गाजर दाखविले होते.जनतेने अशा खोट्या भूलथापांना बळी पडू नये. मी काँग्रेसला विचारू इच्छितो की, आपण देशाच्या सर्व राज्यात मुस्लिमांना आरक्षणाचे लॉलीपॉप दाखविले. मी मुस्लीम मित्रांना विचारू इच्छितो की, त्यांनी आपल्याला देशात कुठे आरक्षण दिले का? हे आश्वासन खोटे ठरले नाही काय? गुजरातमध्ये एका समुदायाला असे आश्वासन देण्यात आले आहे, पण ते आरक्षण देणार कसे? ते ओबीसी, आदिवासी की अनुसूचित जातींपासून हिसकावणार आहेत? असा सवालही मोदी यांनी केला आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समर्थन काँग्रेसला दिले आहे. या पक्षाने आपल्या समुदायाला ‘विशेष श्रेणी’त आरक्षण देण्याची मागणी मान्य केलेली आहे, असेही हार्दिक पटेल यांनी सांगितले होते.काँग्रेसच्या भाषेवर आक्षेप : गुजरातमध्ये शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसºया टप्प्यात, जिथे १४ डिसेंबर रोजी निवडणूक आहे, तिथे जाहीर सभा घेतल्या. लुनावाडा येथील सभेत कॉँग्रेसवर त्यांनी टीका केलीच, पण कॉँग्रेस नेते अतिशय वाईट भाषा वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कॉँग्रेसची आश्वासने खोटी, पाटीदारांना आरक्षणाचे केवळ गाजर दाखवत आहे : मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:07 IST