आता सर्वसामान्य कार्यकर्ताही घेणार राहुल गांधींची भेट, जाणून घ्या कसे..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 13:15 IST2018-02-07T13:09:21+5:302018-02-07T13:15:15+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आठवडयातून एकदिवस कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याची पक्षाची जुनी परंपरा पूनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता सर्वसामान्य कार्यकर्ताही घेणार राहुल गांधींची भेट, जाणून घ्या कसे..
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आठवडयातून एकदिवस कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याची पक्षाची जुनी परंपरा पूनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींनी बुधवारी नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात देशभरातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. राहुल गांधींचे कार्यालय आठवडयातून एकदिवस 9.30 ते 11 या वेळेत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी खुले असेल.
पक्ष कार्यकर्त्यांना वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेता येईल. या चर्चेच्यावेळी तिथे प्रसारमाध्यमांना प्रवेश मिळणार नाही असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. राहुल सकाळी सव्वानऊच्या सुमारास अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात आले व त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि कर्नाटकातून आलेल्या पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली. कर्नाटकमध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी त्यांच्या कार्यकाळात 10 जनपथ निवासस्थानी फक्त महत्वाच्या बैठकांना मार्गदर्शन करायच्या. राहुल यांना ही व्यवस्था मोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहे.
राहुल गांधींसाठी प्रॉक्सी प्रचार
पुढच्यावर्षी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. काँग्रेसने त्यादृष्टीने प्रचार सुरु केला आहे. यावर्षी विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल यांच्याभोवती प्रचार केंद्रीत होईल असे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याविषयी जनमताची चाचपणी सुरु केली आहे. पुढच्या वर्षी राहुल गांधी आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील याबद्दल कुठलीही शंका नाही. पण लोक याबद्दल काय विचार करतात. त्यांना उत्साह वाटतो का ? हे समजून घेतले पाहिजे. अशा प्रकारच्या चाचपणीमधून लोकांना राहुल गांधींमध्ये नेमके काय हवे आहे त्याची कल्पना येईल आणि निवडणूक रणनिती आखण्यामध्ये मदत होईल असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.