हालचालींना वेग! नाना पटोले दिल्लीत, राहुल गांधींची घेतली भेट; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:56 IST2025-02-10T16:54:32+5:302025-02-10T16:56:24+5:30
Congress Nana Patole Meets MP Rahul Gandhi In Delhi: नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

हालचालींना वेग! नाना पटोले दिल्लीत, राहुल गांधींची घेतली भेट; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
Congress Nana Patole Meets MP Rahul Gandhi In Delhi: राज्यात अनेक मुद्द्यांवरून राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे बीड, परभणी, मराठा आरक्षण, ईव्हीएमवर विरोधकांनी उपस्थित केलेली शंका यावरून राजकीय वातावरण तापत असतानाच दुसरीकडे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली. यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांच्या एका शिष्टमंडळाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व व्यथा मांडल्या. संसदेत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न उपस्थित करून न्याय देण्याची विनंती या शिष्टमंडळाने राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्नासन राहुल गांधी यांनी दिल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.
भाजपा सत्तेत असताना महापुरुषांचा सातत्याने अवमान
नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महापुरुषांचा निवडणुकीत मतांसाठी वापर करते व सत्तेत आल्यानंतर त्यांचा अवमान करते हे आपण मागील काही वर्षांपासून पहात आलो आहोत. भाजपाचे डझनभर नेते मंत्री यांनी महापुरुषांचा अपमान केला तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही अवमान केला. भाजपा सरकार असताना असे प्रकार होत असतात. आता अभिनेता राहुल सोलापूरकर जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करत आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मागील आठवड्यातच अपशब्द वापरून सोलापूरकर याने अवमान केला, त्यानंतर त्याने माफी मागितली आणि आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूराने गरळ ओकली आहे आणि माफी मागण्याचे नाटक केले. राहुल सोलापुरकर याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कोणी महापुरुषांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, महायुती सरकारच्या काळात कृषी विभागाने भ्रष्टाचाराचे विक्रम केले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने कोट्यवधी रुपयांचा निधी परस्पर गायब केला. कापूस खरेदी पिशव्या असो वा नॅनो युरिया खरेदी असो, शेतकऱ्यांच्या योजना केवळ कागदावर राहिल्या. शेतकऱ्यांच्या योजनांसाठी डीबीटी पद्धतीचा वापर केला जात असताना त्याला बगल देऊन कृषी विभागाने घोटाळे केले. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला फक्त कृषी विभागातील अधिकारी व कृषी मंत्रीच जबाबदार नाहीत तर तत्कालीन मुख्यमंत्री व राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.