बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार डॉ. उमेश जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला असून ते आधीच भाजपाला विकले गेले आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 मार्चला कलबुर्गीमध्ये सभा असून त्यावेळी जाधव भाजपा प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असले तरीही देवेगौडा यांचा जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या येडीयुराप्पा यांनी बऱ्याचदा काँग्रेसला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत. सोमवारी सकाळी काँग्रेसचे आमदार डॉ. उमेश जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे.
जाधव हे दोनवेळा कलबुर्गी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले आहेत. त्यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी गंभीर आरोप केला असून उमेश जाधव हे भाजपला आधीच विकले गेले होते. यामुळे त्यांचा राजीनामा तातडीने मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ते स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष सोडून भाजपाच्या वळचणीला गेले आहेत. त्याना विश्वासघातकी म्हणून ओळखले जाईल.
कलबुर्गीमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेदरम्यान मोदी यांच्या उपस्थितीत जाधव पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच जाधव यांना काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात लोकसभेला भाजपा तिकिट देण्याची शक्यता आहे. जाधव यांनी दोन महिन्यांपूर्वीच काँगेस सोडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, जाधव यांच्या राजीनाम्याचे सोयरसूतक नसल्याचे दाखवत संयुक्त जनता दल आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लोकसभेसाठी जागा वाटप करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चर्चा योग्य दिशेने आणि सकारात्मक सुरु असल्याचे सांगत लवकरच जागा जाहीर करण्याच येणार असल्याचे सांगितले.
कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घातले होते व प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. भाजपाचे नेते बी. एस. येडीयुरप्पा यांची आमदारांना पैसे देण्याबाबतची ध्वनिफीत उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस व कर्नाटकचे प्रभारी खा. के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की, कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या प्रयत्नांचा पर्दाफाश झाला आहे. येडियुरप्पांनी प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यांनी मोदी-शहा यांचा हवाला दिला आहे.