भाजपसाठी काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना हाकलणार; राहुल यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:32 IST2025-03-09T12:32:53+5:302025-03-09T12:32:53+5:30
काँग्रेस पक्ष जोपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडणार नाही, तोपर्यंत लोक काँग्रेसला मतदान करणार नाही

भाजपसाठी काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना हाकलणार; राहुल यांचा इशारा
अहमदाबाद : भाजपासाठी काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केले.
गुजरात दौऱ्यावर आलेले राहुल गांधी कार्यकर्त्यासमोर म्हणाले की, काँग्रेस पक्ष जोपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडणार नाही, तोपर्यंत लोक काँग्रेसला मतदान करणार नाही. वास्तविक गुजरातमधील लोक सापळ्यात सापडले आहेत. हिरे उद्योग, वस्त्रोद्योग आणि सिरॅमिक उद्योग रसातळाला गेला आहे. लोकांना एका नव्या दृष्टिकोनाचा शोध आहे. भाजपाच्या तीन दशकाच्या शासन काळात जी स्वप्ने दाखविण्यात आली होती, ती पूर्ण झालेली नाहीत.
राहुल गांधी यांनी म्हटले की, गुजरात काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते यांच्यात दोन प्रकारचे लोक आहेत. एक जनतेशी प्रामाणिक आहेत, त्यांच्यासाठी लढतात, त्यांच्या हृदयात काँग्रेसची विचारधारा आहे. दुसरे लोकांपासून तुटलेले आहेत, जे लोकांचा सन्मान करीत नाहीत आणि त्यातील अर्धेअधिक भाजपासोबत आहेत. अशा लोकांना शोधून काढून दूर सारण्याची गरज आहे. या दोन्ही गटांना वेगळे केले जात नाही, तोपर्यंत गुजराती लोक काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाहीत.
निवडणुकीची तयारी
२०२७ मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राहुल गांधी हे गुजरात दौऱ्यावर आले आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. भाजपाला पराभूत करण्यासाठी मजबूत नियोजन करण्याचे आश्वासनही पक्ष कार्यकर्त्यांना दिले.
अहमदाबादेत होणार काँग्रेसचे अधिवेशन
येत्या ८ व ९ एप्रिल रोजी अहमदाबादेत अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) अधिवेशन होत आहे. गुजरातेत तब्बल ६४ वर्षांनी एआयसीसीचे अधिवेशन होणार आहे. याची जोरात तयारी सुरु आहे.