निवडणुकीचं तिकीट कापलं, 'काँग्रेस नेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 17:08 IST2018-11-09T17:04:33+5:302018-11-09T17:08:18+5:30
निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी नेते मंडळीची चाललेली धडपड, वरिष्ठांना खुश करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या अनोख्या शकला हे आपल्यासाठी नवीन नाही.

निवडणुकीचं तिकीट कापलं, 'काँग्रेस नेत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न'
ग्वालियर : निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी नेते मंडळीची चाललेली धडपड, वरिष्ठांना खुश करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या अनोख्या शकला हे आपल्यासाठी नवीन नाही. मात्र, निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने नेत्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडला असेल. काँग्रेसच्या माजी जिल्हा अध्यक्ष प्रेमशंकर कुशवाह यांनी तिकीट न मिळाल्याने विष घेतलं.
कुशवाह हे सध्या प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य आहेत आणि त्यांनी माधवराव सिंधिया यांच्या फोटोसमोर विष प्राशन केलं. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये काँग्रेस नेत्यांची रिघ लागली आहे.
प्रेमसिंग कुशवाह यांनी ग्वालियर दक्षिण आणि ग्वालियर पूर्व विधानसभा क्षेत्राचे तिकीट मागितले होते. मात्र, काँग्रेसने त्यांना एकही तिकीट दिले नाही. ग्वालियर दक्षिण येथून सुरेश पचौरी समर्थक प्रवीण पाठक यांना तिकीट मिळाल्याची घोषणा होताच कुशवाह नाराज झाले. पाठक यांच्या नावाच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे पोस्टर फाडली. कुशवाह यांनी आपल्या समर्थकांसह जयविलास पॅलेससमोर आंदोलन केले. हताश झालेल्या कुशवाह यांनी अखेरीस विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.