सोनिया, राहुल, प्रियांका गांधी आपल्या पदांचे राजीनामे देणार?; आज कार्यकारिणीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 06:29 IST2022-03-13T06:28:50+5:302022-03-13T06:29:07+5:30

काँग्रेसचा इन्कार

Congress Leader Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi to resign ?; Executive meeting today | सोनिया, राहुल, प्रियांका गांधी आपल्या पदांचे राजीनामे देणार?; आज कार्यकारिणीची बैठक

सोनिया, राहुल, प्रियांका गांधी आपल्या पदांचे राजीनामे देणार?; आज कार्यकारिणीची बैठक

-शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाल्यानंतर रविवारी होत असलेल्या पक्षकार्यकारिणीच्या बैठकीत विद्यमान नेतृत्वावर घणाघाती टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीच्या प्रारंभीच पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह राहुल  आणि प्रियांका  आपापल्या पदांचे राजीनामे देणार असल्याचे कळते.  मात्र, काँग्रेसने या वृत्ताचा इन्कार 
केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  काँग्रेसमध्ये तातडीने संघटनात्मक निवडणुका घेण्याचा आग्रह सोनिया गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत धरणार आहेत. या निवडणुकांमुळे काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष व नवी कार्यकारिणी अशा दोन्ही गोष्टी मिळतील. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत कोणते मुद्दे उपस्थित करायचे याची रणनीती  पक्षातील २३ नाराज नेत्यांनी ठरविली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते  गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी नाराज नेत्यांची एक बैठकही झाली. रविवारी राहुल यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.  

सूत्रांच्या सांगण्यानुसार, अशोक गेहलोत किंवा सचिन पायलट यापैकी एका नेत्याची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करावी, असा मतप्रवाह आहे. गेहलोत अध्यक्ष झाल्यास पायलट यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी केली जाणार आहे. पंजाब प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सुनील जाखड यांच्याकडे देण्याची अनुकूलता पक्षात असल्याचे समजते. उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वात बदल केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवारी दिल्लीत दाखल झाले. थोरात काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत, तर चव्हाण यांनी बंडखोर नेत्यांशी चर्चा केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर होणार नसल्याचे थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. 

Web Title: Congress Leader Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi to resign ?; Executive meeting today