काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:54 PM2019-07-30T15:54:10+5:302019-07-30T16:21:02+5:30

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे.

Congress leader Sanjay Singh resigned from party & Rajya Sabha membership | काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

काँग्रेसला मोठा धक्का, गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि राहुल गांधी यांनी तडकाफडकी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सुरू झालेली काँग्रेसची घसरण सुरूच आहे. दरम्यान, आज काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून, गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले उत्तर प्रदेशातील नेते संजय सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय सिंह यांनी आज पक्ष सदस्यत्व आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी संजय सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी याची माहिती सभागृहात दिली. 



आज राज्यसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते संजय सिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेतील मतांचे गणितही बदलणार आहे. आता संजय सिंह हे बुधवारी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आपली दुसरी पत्नी अमिता सिंह ही सुद्धा लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देईल, असा दावा सिंह यांनी केला आहे. संजय सिंह यांची पहिली पत्नी गरिमा सिंह अमेठी विधानसभा मतदारसंघातून भाजपा आमदार आहे. संजय सिंह हे राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जात.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय सिंह यांनी सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या संजय सिंह यांना काँग्रेसने आसाममधून राज्यसभेवर पाठवले होते. 1980 मध्ये जेव्हा संजय गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा संजय सिंह यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.  

अमेठी मतदारसंघात भक्कम जनाधार असलेल्या संजय सिंह यांनी याआधीही एकदा काँग्रेस पक्ष सोडला होता. मात्र यावेळी आपण पूर्ण विचार करून पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. ''गेल्या 15-20 वर्षांपासून काँग्रेसमध्ये विसंवादाची स्थिती निर्माण झाली आहे. आज घडीला संपूर्ण देश मोदींसोबत उभा आहे. त्यामुळे जर देश मोदींसोबत असेल तर मीसुद्धा त्यांच्यासोबत आहे. मी उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मी काँग्रेसचा आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.''



 दरम्यान, संजय सिंह यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेचे संख्याबळ 240 पवर आले आहे. 245 सदस्य असलेल्या या सभागृहातील चार जागा आधीच रिक्त होत्या. त्यात आला अजून एका जागेची भर पडली आहे.  

Web Title: Congress leader Sanjay Singh resigned from party & Rajya Sabha membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.