इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका; म्हणाले, "पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 15:29 IST2021-06-07T15:27:05+5:302021-06-07T15:29:33+5:30
Petrol Diesel Price Hike : गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलनं पार केली शंभरी.

इंधनाच्या दरवाढीवरून राहुल गांधींची टीका; म्हणाले, "पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे..."
गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरीही गाठली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर असतील किंवा कोरोनाची परिस्थिती असेल यावरून सातत्यानं विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेदेखील सातत्यानं टीका करत आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींवरून त्यांनी 'महागाईचा विकास' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर जोरदार टीका केली. "अनेक राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होत आहे. पेट्रोल पंपावर बिल देताना तुम्हाला मोदी सरकारद्वारे करण्यात आलेला महागाईतील विकास दिसेल. कर वसुली, महागाईच्या लाटा सातत्यानं येत जात आहेत," असं राहुल गांधी म्हणाले.
कई राज्यों में अनलॉक की प्रक्रिया शुरू हो रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2021
पेट्रोल पम्प पर बिल देते समय आपको मोदी सरकार द्वारा किया गया महंगाई में विकास दिखेगा।
टैक्स वसूली महामारी की लहरें लगातार आती जा रही हैं।
पेट्रोल शंभरी पार
गेल्या आठवड्यात एक दिवसाआड पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरवाढ करण्यात आली होती. आता मात्र सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढ करून सर्वसामान्यांना झटका दिला आहे. सोमवारी पेट्रोल २८ पैसे, तर डिझेल २७ पैशांनी महाग झाले आहे. वाढलेल्या दरानंतर दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.३१ रुपये, तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर १०१.५२ रुपये झाला आहे.
गेले महिनाभर सुरू असलेल्या इंधनदरवाढीमुळे ग्राहक आणि मालवाहतूकदारांचे खिशाला कात्री लागली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०१.५२ रुपये झाला आहे. तर, दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९५.३१ रुपये झाला आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोलचा भाव ९६.७१ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९५.२८ रुपये झाला आहे. काल रविवारी देशभरात पेट्रोल २७ पैसे आणि डिझेल २९ पैशांनी महागले होते.