Congres Priyanka Gandhi : “देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 13:27 IST2023-03-26T13:26:16+5:302023-03-26T13:27:26+5:30
प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला.

Congres Priyanka Gandhi : “देशाचे पंतप्रधान भ्याड, माझ्यावर केस करा.., तुरुंगात टाका..,” प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली. राजघाटवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी पंतप्रधानांचा भ्याड असा उल्लेख करत टीकेचा बाण सोडला.
“या देशाचे पंतप्रधान भ्याड आहेत. माझ्यावर केस करा. मला तुरुंगात टाका… पण मी घाबरणार नाही. परंतु देशाचे पंतप्रधान भ्याड आहेत हेच सत्य आहे. आपल्या सत्तेमागे लपत आहेत. ते अहंकारी आहेत आणि या देशाची, हिंदू धर्माची जुनी परंपरा आहे की अहंकारी राजाला जनता उत्तर देते,” अशा शब्दात प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
“संसदेत माझ्या शहीद वडिलांचा अपमान झाला, शहीद पंतप्रधानांच्या मुलाला मीर जाफर म्हटलं जातं. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा अपमान होतो, पण यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असं त्या म्हणाल्या.
३२ वर्षांपूर्वीच्या घटनेचा उल्लेख
“१९९१ साली माझ्या वडिलांची अंत्ययात्रा त्रिमूर्ती भवनातून निघत होती. माझी आई, माझा भाऊ सोबत आम्ही गाडीत बसलो होतो आणि आमच्या समोर भारतीय सैन्याचा ट्रक होता. त्यावर माझ्या वडिलांचा पार्थिल होतं. थोड्या अंतरावर गेल्यावर राहुल म्हणू लागला की मला खाली उतरायचं आहे, तेव्हा सुरक्षेचा मोठा प्रश्न असल्याने आईनं नकार दिला. राहुल गाडीतून खाली उतरला आणि मागे जाऊ लागला. भर उन्हात वडिलांच्या अंत्ययात्रेमागे चालत इथपर्यंत पोहोचला. माझ्या भावानं माझ्या शहीद वडिलांचे अंत्यसंस्कार या ठिकाणापासून सुमारे ५०० यार्ड अंतरावर केले, ते चित्र आजही माझ्या मनात आहे,” असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.