ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय जनता पक्षाकडून देशभरात तिरंगा यात्रा आयोजित केली जात आहे. आज लखनौमध्येही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारत शौर्य तिरंगा यात्रेचं उद्घाटन केलं. आपल्या जवानांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. याच दरम्यान आता काँग्रेस नेत्याने यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी तिरंगा यात्रेवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपावर 'ऑपरेशन सिंदूर'चा राजकीय फायदा घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत काँग्रेसचा पाठिंबा देशाच्या सैन्यासोबत होता आणि भविष्यातही राहील असंही म्हटलं आहे.
दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत काँग्रेस भारतीय सैन्यासह सरकारसोबत खंबीरपणे उभी आहे असं प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे लवकरच विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. "पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे. जेणेकरून ऑपरेशन सिंदूर ज्या पद्धतीने मध्येच थांबवण्यात आले आणि युद्धबंदी जाहीर करण्यात आली त्यानंतर विरोधकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील."
"विरोधकांना जाणून घ्यायचं आहे की, आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?" असा सवाल प्रमोद तिवारी यांनी विचारला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात भाजपा शौर्य तिरंगा यात्रा काढली जात आहे. उत्तराखंडची राजधानी लखनौमध्येही आज मुख्यमंत्री धामी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.