"काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही..."; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:44 IST2024-12-15T13:43:07+5:302024-12-15T13:44:24+5:30
संसदेतल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही..."; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार
DK Shivakumar slams PM Modi Speech: लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रविवारी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस पक्षामुळेच पंतप्रधान मोदींना सर्व अधिकार मिळाले आहेत. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पदावर असल्याचे डीके शिवकुमार यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका करत हा जुना पक्ष भारतीय संविधानाचाच नव्हे तर स्वतःच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेचाही अनादर करत असल्याचा आरोप केला होता. संविधानाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष चर्चेत भाग घेतला होता. काँग्रेसने जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष म्हणून पक्षात घेण्यासाठी पक्षातील लोकशाही भावना बाजूला ठेवल्या होता असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेवर काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाष्य केलं आहे. "पंतप्रधानांना हे माहित असले पाहिजे की काँग्रेसनेच त्यांना संविधानासह, राष्ट्रध्वजासह, राष्ट्रगीत आणि स्वातंत्र्यासह सर्व अधिकार दिले आहेत. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य मिळवून देऊन लोकशाही दिली असताना आता ते या देशाचे पंतप्रधान आहेत. संविधान नसते तर ते या देशाचे पंतप्रधान होऊ शकले नसते," असं डीके शिवकुमार म्हणाले. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ११ आश्वासनांवर बोलताना शिवकुमार यांनी "बघू या. या देशासाठी चांगल्याची आशा करूया," असं म्हटलं.
संविधानाचा अनादर केल्याचा आरोप करत मोदींनी शनिवारी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकरा आश्वासनं दिली होती. "सरकारने आणि लोकांनी त्यांचे कर्तव्य बजावले पाहिजे आणि देशाचे राजकारण परिवारवाद पासून मुक्त झाले पाहिजे. आणीबाणीत देश तुरुंगात बदलला होता. नागरिकांचे हक्क हिरावले गेले आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर अंकुश ठेवला गेला होता. १९४७ ते १९५२ पर्यंत, भारतात कोणतेही निवडून आलेले सरकार नव्हते. परंतु एक सरकार होते ज्यामध्ये कोणत्याही निवडणुका झालेल्या नव्हत्या.१९५२ पूर्वी, राज्यसभेची स्थापना झाली नव्हती आणि कोणत्याही राज्याच्या निवडणुका झाल्या नाहीत, म्हणजे लोकांचा जनादेश नव्हता," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती.