ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 21:23 IST2025-10-25T20:26:52+5:302025-10-25T21:23:38+5:30
या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.

ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
भोपाळ - मध्य प्रदेशात ज्या कफ सिरपमुळे २६ मुलांचा जीव गेला. त्यावरून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारवर मोठा हल्लाबोल केला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या औषध कंपनीवर सरकारने यासाठीच कारवाई केली नाही कारण या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत देणगी दिली जाते. या औषध कंपन्यांनी भाजपाला ९४५ कोटी देणगी दिली होती असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
भोपाळमध्ये पत्रकार परिषद घेत दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, २ सप्टेंबरपासून आतापर्यंत २६ मुलांचा जीव कफ सिरप घेतल्याने गेला आहे. ज्यात डायएथलीन ग्लाइकॉलचं प्रमाण ४८.६ टक्के होते. याचे सुरक्षित प्रमाण ०.०१ टक्के इतके असायला हवे. आता तपासात जर सिरपमध्ये विषारी रसायन मिसळल्याचे सिद्ध झाले असेल तर आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या पदावर का राहायला हवे? ज्या औषध कंपन्यांनी विषारी औषध विकले, त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपाला निवडणुकीत फंड दिला आहे. त्यामुळे त्यांना कारवाईपासून संरक्षण मिळत आहे. या औषध कंपन्यांनी इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून एकूण ९४५ कोटी रूपये भाजपाला देणगी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला.
इतकेच नाही तर ज्या कंपन्यांकडून भाजपाला निवडणुकीत फंड मिळाला, त्यातील ३५ कंपन्या औषधांच्या गुणवत्तेच्या मानकांमध्ये पात्र नाहीत. लोकांचा जीव आणि सुरक्षेशी खेळले जात आहे. सत्तेचे संरक्षण मिळल्याने कुणीही या घटनेची जबाबदारी घ्यायला येत नाही. मुलांचा जीव घेणाऱ्या दोषी कंपन्यांवर आणि त्या विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केंद्र आणि राज्याकडे केली आहे.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे अनेक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशात औषधी लिहून देणाऱ्या 3 डॉक्टरांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाला जबाबदार असलेल्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनीचा मालक गोविंदनाथन रंगनाथन याला अखेर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली. मात्र या प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.