कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:06 IST2025-12-18T14:06:36+5:302025-12-18T14:06:46+5:30
Gruha Lakshmi Scheme Payment: हिवाळी अधिवेशनादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरुवातीला सर्व देयके पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र, विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी पुराव्यांसह सरकारला धारेवर धरल्यानंतर, मंत्र्यांनी आपल्या विधानात दुरुस्ती केली.

कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारच्या पाच प्रमुख हमींपैकी सर्वात लोकप्रिय असलेल्या 'गृह लक्ष्मी' योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे मासिक २,००० रुपयांचे मानधन फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रखडल्याचे सरकारने अधिकृतपणे मान्य केले आहे. यामुळे राज्यातील १.२६ कोटी लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरुवातीला सर्व देयके पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र, विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी पुराव्यांसह सरकारला धारेवर धरल्यानंतर, मंत्र्यांनी आपल्या विधानात दुरुस्ती केली. "प्रशासकीय त्रुटीमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, याची मला कल्पना नव्हती. सभागृहाची दिशाभूल करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता," असे म्हणत त्यांनी माफी मागितली.
काय आहे 'गृह लक्ष्मी' योजना?
या योजनेअंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा २,००० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. सरकारने आतापर्यंत या योजनेवर ५२,४१६ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मात्र, ५,००० कोटी रुपयांचा निधी अद्याप वितरित न झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
भाजप नेते आर. अशोक आणि इतर आमदारांनी सरकारवर 'महिलांची फसवणूक' केल्याचा आरोप केला. "सरकारकडे निधीची कमतरता आहे का? की हा पैसा इतर कामांसाठी वळवला गेला?" असा प्रश्न विचारत भाजप आमदारांनी सभात्याग केला. थकीत मानधन तात्काळ जमा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.