Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:53 IST2025-01-03T18:51:31+5:302025-01-03T18:53:43+5:30

Atishi Alka Lamba: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आज महिला नेत्याची उमेदवारी जाहीर केली.

Congress has announced Alka Lamba's candidature against Delhi Chief Minister and Aam Aadmi Party candidate Atishi. | Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

Delhi Elections 2025: मुख्यमंत्री आतिशी यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला! 

Delhi Elections 2025 Latest Update: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एका उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेसने पक्षाच्या नेत्या अलका लांबा यांना मुख्यमंत्री आणि आपच्या उमेदवार आतिशी यांच्या मतदारसंघात मैदानात उतरवले आहे. अलका लांबा यांनी २०२५ वर्षाच्या पहिल्याच दिवशी कालकाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. 

विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने सर्व मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या आतिशी यांना कालकाजी विधानसभा मतदारसंघातूनच उमेदवारी देण्यात आली आहे. 

आतिशी यांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबद्दल उत्सुकता होती. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला असून, आता भाजप कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष आहे. सध्या तरी भाजपचे दक्षिण दिल्लीचे माजी खासदार रमेश बिधुडी यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

काँग्रेस ४८ उमेदवार केले जाहीर

इंडिया आघाडीच घटक पक्ष असलेल्या आप आणि काँग्रेसची दिल्लीत आघाडी होऊ शकली नाही. अरविंद केजरीवालांच्या नेतृत्वाखालील आपने स्वबळाची घोषणा करत उमेदवारांची घोषणा करून टाकली. आपने ७० उमेदवार जाहीर केले असून, काँग्रेसनेही आतापर्यंत ४८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 

आपच्या बड्या नेत्यांविरोधात काँग्रेसनेही तगडे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात माजी खासदार संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याविरोधात फरहाद सुरी यांना उमेदवारी दिली आहे. 

आतिशी यांच्याविरोधात अलका लांबा यांना तिकीट देण्यात आले आहे. २०१५ ते २०२० या काळात अलका लांबा या चांदनी चौक विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. या मतदारसंघात यावेळी काँग्रेसने माजी खासदार जे.पी. अग्रवाल यांना तिकीट दिले आहे. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अलका लांबा या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या होत्या. 

विद्यार्थी नेता ते आमदार 

अलका लांबा यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाली. दिल्ली विद्यापीठात त्या विद्यार्थी नेता होत्या. नंतर २००३ मध्ये अलका लांबा यांनी माजी मुख्यमंत्री राहिलेल्या भाजपचे मदनलाल खुराणा यांच्याविरोधात मोतीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढल्या होत्या. माजी मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढवल्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. 

२० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या काँग्रेससोबत आहेत. २६ डिसेंबर २०१४ मध्ये त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता आणि आम आदमी पक्षात सामील झाल्या होत्या. २०१५ मध्ये त्या चांदनी चौक विधानसभा निवडणुकीत जिंकल्या. २०१९ मध्ये पक्षात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगत त्यांनी आपला रामराम केला. त्यानंतर त्या पुन्हा काँग्रेसमध्ये आल्या होत्या. त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द झाली होती. 

Web Title: Congress has announced Alka Lamba's candidature against Delhi Chief Minister and Aam Aadmi Party candidate Atishi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.