राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (४ फेब्रुवारी) उत्तर देणार होते. पण, विरोधकांची घोषणाबाजी आणि गोंधळ कायम राहिल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधानांचे उत्तराचे भाषण होऊ शकले नाही. काल झालेल्या या गोंधळाबद्दल आता भाजपाचे खासदार सौमित्र खान यांनी काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर लोकसभेत शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न होता, असा स्फोटक दावा केला आहे.
वृत्तसंस्था एएनआयनेही सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले असून, त्यात पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याची योजना आखली जात असल्याची स्पष्ट माहिती होती. महिला खासदारांना पंतप्रधानांच्या समोर कडे करण्यासाठी पुढे पाठवले गेले, असेही सूत्रांच्या हवाल्याने या वृत्तात म्हटले आहे.
पहिल्यांदाच असं घडलं
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन दिवस झालेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (४ फेब्रुवारी) सायंकाळी उत्तर देणार होते. पण, विरोधकांनी पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्यापूर्वीच जोरदार घोषणाबाजी केली. माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावरून विरोधकांचा गोंधळ वाढत गेला. त्यावेळी महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनासमोर येत होत्या.
याबद्दलच एएनआयला सूत्रांनी सांगितले की, "राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांचे आभाराचे भाषण लोकसभेत न होणे हे अभूतपूर्व आहे. पंतप्रधान मोदींवर लोकसभेत शारीरिक हल्ला करण्याची योजना काँग्रेसकडून आखली जात असल्याची स्पष्ट माहिती होती. त्यामुळे महिला खासदारांना पुढे पाठवण्यात आले. पंतप्रधान संसदेत हजर असून आणि भाषण करण्यासाठी तयार असतानाही, या परिस्थितीमुळे लोकसभा अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाशिवाय लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
भाजपा खासदार खान काय बोलले?
एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपा खासदार सौमित्र खान म्हणाले, "ज्या प्रकारे विरोधक वागत आहेत. त्यावरून असे वाटत आहे की, हे लोक मोदींना मारण्यासाठी षडयंत्र करत आहेत. काल जे घडले आहे. जे घडत होतं, त्यावरून असं वाटत होतं की, हे लोक मोदींना मारण्यासाठी जात आहेत."
"मोदींना हटवा सगळं काही होईल. विरोधकाचे राजकारणात काहीही अस्तित्व राहिलेले नाही, त्यामुळे ते मोदींना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. ते डाव्या बाजूला बसतात, पण उजव्या बाजूला का येत होते, कारण मोदींवर हल्ला करण्यासाठी. विरोधक जे करत आहेत, ते योग्य नाहीये", असे खान म्हणाले.