congress on gujarat rajya sabha election amit shah smriti irani | काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी
काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर अनेक राज्यसभा खासदार आता लोकसभेत जाणार आहे. त्यामुळे राज्यसभा खासदारांच्या रिक्त जागांकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. यात दगाफटका होण्याच्या भीतीने गुजरातमध्ये दोन राज्यसभा सदस्यांसाठीची निवडणूक एकाचवेळी घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

गुजरातमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह आणि स्मृती इराणी यांच्या राज्यसभा जागा रिक्त होत आहे. उभय नेते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठी मतदार संघातून पराभव केला. तर अमित शाह गांधीनगरमधून निवडून आले आहे. शाह आणि इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी, अशी मागणी अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे.

काँग्रेस नेते सिंघवी यांनी दावा केला की, निवडणूक आयोग दोन्ही जागांवर वेगवेगळी निवडणूक घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र निवडणूक आयोगाने या दोन्ही जागांवरील निवडणूक वेगवेगळी घेणे संविधानाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे अमित शाह आणि स्मृती इराणी यांच्या जागांवर सोबत निवडणूक घेण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक एकत्र झाल्यास सत्ताधारी भाजप एका जागेवर विजय मिळवू शकते तर विरोधकांना एका जागेवर विजय मिळवता येणार आहे. मात्र वेगवेगळ्या वेळेवर निवडणूक झाल्यास गडबड होऊ शकते. त्यामुळे काँग्रेस या मुद्दावर निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे सिंघवी म्हणाले. अर्थात फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेसला दोन्ही जागा गमावण्याची भीती आहे.


Web Title: congress on gujarat rajya sabha election amit shah smriti irani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.