गुगल ट्रेंड्समध्ये काँग्रेसने भाजपला अन् राहुल गांधींनी मोदींना हरवले...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 15:34 IST2018-12-13T15:33:51+5:302018-12-13T15:34:48+5:30
पाच राज्यांच्या निवडणुकांवेळी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या विषयांची आकडेवारी समोर आली आहे.

गुगल ट्रेंड्समध्ये काँग्रेसने भाजपला अन् राहुल गांधींनी मोदींना हरवले...!
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मतदानापासून निकालापर्यंत भाजपापेक्षा काँग्रेसला गुगलवर जास्त सर्च करण्यात आले. गुगल ट्रेंड्सनुसार निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडमध्ये रमन सिंह आणि राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना लोकांनी सर्वाधिक सर्च केले. तर राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना बरोबरीत सर्च करण्यात आले. महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोदींपेक्षा राहुलना सर्च करण्यात आले आहे.
मध्य प्रदेशमध्ये 28 नोव्हेंबरला मतदान झाले होते. गुगल ट्रेंड्सनुसार 28 नोव्हेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान 12 दिवसांत गुगलवर लोकांनी भाजपाच्या तुलनेत काँग्रेसला सर्वाधिक सर्च केले.
28 नोव्हेंबरच्या दिवशी काँग्रेसला 100 अंक तर भाजपला 91 अंक मिळाले होते. तर 9 डिसेंबरला काँग्रेसला 54 अंक आणि भाजपला 46 अंक मिळाले होते. या काळात गुगलवर शिवराज सिंहांची लाट होती.
28 नोव्हेबरला शिवराज 53, ज्योतिरादिस्त सिंधिया यांना 15 आणि कमलनाथ यांना 7 अंक मिळाले होते. तर 9 डिसेंबरच्या दिवशी शिवराज यांना 23, सिंधिया यांना 9 आणि कमलनाथ यांना 4 अंक मिळाले होते.