आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:31 IST2019-03-07T13:31:15+5:302019-03-07T13:31:54+5:30
काँग्रेस-आप यांची आघाडी फिस्कटल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे 9 आमदार येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा दिल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला

आपचे 9 आमदार संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे. काँग्रेस-आप यांची आघाडी फिस्कटल्यानंतर आता आम आदमी पक्षाचे 9 आमदार येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा दिल्ली काँग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला आहे. या नऊ आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचेही कोचर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची बैठक काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी घेतली होती, या बैठकीनंतर काँग्रेस आपसोबत आघाडी करणार नाही असं काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या शीला दिक्षित यांनी स्पष्ट केले होते. आपने निलंबित केलेले माजी मंत्री संदीप कुमार यांनी दिल्ली काँग्रेस समितीच्या कार्यालयाला भेट दिली. कोचर यांनी संदीप कुमार यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांची भेट घेतल्यानंतरच हे वक्तव्य केले आहे.
काँग्रेसकडून करण्यात आलेला हा दावा आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी फेटाळून लावला आहे. आपचा एकही आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसून संदीप कुमार हे देखील आपसोबत आहेत. येणारी निवडणूक लढण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज असल्याचे सांगितले.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व 7 जागा काँग्रेस स्वबळावर लढणार असून आपची आघाडी होणार नाही असं शीला दिक्षित यांनी सांगितले होते. त्यावर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. काँग्रेस भाजपविरोधी मतांमध्ये फूट पाडून एकप्रकारे भाजपला मदत करत आहे, काँग्रेस-भाजपाची छुपी युती असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला होता.