काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत मोठं विधान केलं. ज्यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. तसेच भाजपाने टीकेची झोड उठवली आहे.
चरणजीत सिंग चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर कोणालाही ते कळणार नाही का? असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं. चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागण्याची ही पहिलीच वेळ नाही, पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी असंच विधान केलं होतं. मात्र आता काही वेळाने त्यांनी या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.
"सर्जिकल स्ट्राईकचा प्रश्नच येत नाही"
"सर्जिकल स्ट्राईकचा प्रश्नच येत नाही. त्याचे पुरावे मागितले जात नाहीत आणि मी आता ते मागत नाही" असं म्हटलं आहे. वृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. "मी हे आधीही सांगितलं आहे आणि पुन्हा सांगू इच्छितो की, काँग्रेस प्रत्येक बाबतीत सरकारसोबत उभी आहे. सरकारने त्यांचा पाणीपुरवठा बंद केला किंवा कोणतीही कारवाई केली तरी काँग्रेस त्यांच्यासोबत उभी आहे. सरकार कोणतीही कारवाई करेल, आम्ही त्याचं समर्थन करू."
"सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे "धर्म विचारून मारण्यात आलं, त्यांना न्याय हवा"
"आम्हाला दहशतवाद्यांवर कडक कारवाई व्हायला हवी आहे आणि मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांना न्याय हवा आहे. ही आमची मागणी आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे. आज सरकारकडून अपेक्षा आहे की हे घडले पाहिजे. सर्जिकल स्ट्राईकचा प्रश्नच येत नाही. पुरावे मागितले जात नाहीत आणि मी आताही मागत नाही. मी फक्त एवढेच म्हणत आहे की, या मुद्द्याला दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका. ज्यांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आलं, त्यांना आज न्याय हवा आहे. आम्ही सरकारसोबत आहोत" असं चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलं आहे.