४६ वर्षांनंतर बदलला काँग्रेसचा पत्ता, अत्याधुनिक सुविधांनी युक्त नव्या मुख्यालयाचं उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:54 IST2025-01-15T12:54:35+5:302025-01-15T12:54:53+5:30
Congress New Headquarter: देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे.

४६ वर्षांनंतर बदलला काँग्रेसचा पत्ता, अत्याधुनिक सुविधांनी युक्त नव्या मुख्यालयाचं उद्घाटन
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचं नव्या ठिकाणी स्थलांतर झालं असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचं उदघाटन आज संपन्न झालं आहे. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते आज पक्षाच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते.
मात्र काँग्रेसच्या मुख्यालयाचं उदघाटन झाल्याझाल्याच त्याच्या नावावरून वादांना सुरुवात झाली आहे. तसेच या वादात भाजपानेही उडी घेतली आहे. काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाची इमारत दीन दयाल उपाध्याय मार्गावर आहे. इथून जवळच काही अंतरावर भाजपाचं कार्यालय आहे. मात्र वैचारिक मतभेदांमुळे काँग्रेसने आपल्या पत्त्यामध्ये दीन दयाय उपाध्याय यांचं नाव येऊ नये यासाठी मुख्यालयाचा मुख्य दरवाजा कोटला मार्गाच्या दिशेने ठेवला आहे. तसेच प्रशासनाकडून पत्ता बदलवून घेत तो ९ ए कोटला मार्ग असा करून घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता हा इंदिरा गांधी भवन, ९ए, कोटला मार्ग असा असेल.
दरम्यान, काँग्रेसने आपल्या मुख्यालयाचं नामकरण इंदिरा गांधी यांच्या नावावरून केल्याने काँग्रेसमध्येच काही मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकांमधून या मुख्यालयाचं नामकरण दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नावावरून करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भाजपानेही डॉ. मनमोहन सिंग यांचं नाव काँग्रेसच्या मुख्यालयाला का देण्यात आलेलं नाही, असा सवाल विचारला आहे.
मात्र काँग्रेसकडून हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले की, इंदिरा भवन नावाबाबत मनमोहन सिंग यांचं कुटुंब आणि इतरांनाही आक्षेप नाही आहे. इंदिरा भवन हे नाव सर्वांना मान्य आहे. तर काँग्रेस नेते पवन कुमार बन्सल यांनी सांगितले की, हे नाव १० वर्षांपूर्वीच निश्चित झालं होतं. प्रत्येक गोष्टीवरून वाद उत्पन्न करणं योग्य नाही.