कर्नाटकात काँग्रेस, भाजपाच्या लोकप्रियतेचा लागणार कस, ३३ वर्षांची परंपरा सिद्धरामय्या मोडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:25 IST2018-05-13T01:25:15+5:302018-05-13T01:25:15+5:30
कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का

कर्नाटकात काँग्रेस, भाजपाच्या लोकप्रियतेचा लागणार कस, ३३ वर्षांची परंपरा सिद्धरामय्या मोडणार?
बंगळुरू : कर्नाटकातील मतदारांनी १९८५ पासून कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तास्थानी बसवले नसून, ही ३३ वर्षांची परंपरा मुख्यमंत्री सिद्धरामय्या मोडून दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेथील मतदारांनी तेव्हापासून प्रत्येक सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत विरोधी बाकांंवर आणून ठेवले आहे. ही परिस्थिती बदलून दाखवली, तर भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सिद्धरामय्या अधिक लोकप्रिय असल्याचे सिद्ध होईल.
कर्नाटकात १९८५ पासून किमान ६६ टक्के तर कमाल ७२ टक्के इतके मतदान झाले आहे. मतदानातील वाढीचा फायदा ठराविक पक्षाला झाला, असेही तिथे घडलेले नाही. दक्षिणेकडील कर्नाटक या एकमेव राज्यात भाजपाचे २00८ साली सरकार आले होते. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, रेड्डी बंधूंचे खाण घोटाळे आणि भाजपाअंतर्गत वाद यांमुळे २0१४ साली मतदारांनी काँग्रेसलाच निवडून दिले. या पार्श्वभूमीवर आज झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडते, हे मंगळवारी मतमोजणीनंतर समजेल.
माझा शपथविधी १७ मे रोजी : येडियुरप्पा
सिद्धरामय्या, येडियुरप्पा व कुमारस्वामी या तिन्ही नेत्यांनी सकाळीच मतदान केले. त्यानंतर बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजपाला १५0 जागा मिळतील आणि १७ मे रोजी आपण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ , असा दावा केला. त्याआधी आपण दिल्लीत नेत्यांना भेटू, असेही ते म्हणाले.
काँग्रेसलाच मिळेल
बहुमत : सिद्धरामय्या
काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुन्हा आमचेच सरकार येईल, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला. येडियुरप्पा यांच्या दाव्याविषयी विचारता ते म्हणाले की, येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे ते असे बोलत असावेत. भाजपाला ६0 ते ६५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाही.
मीच होणार मुख्यमंत्री : कुमारस्वामी
कुमारस्वामी म्हणाले की, आमचे सरकार येईल आणि मीच मुख्यमंत्री बनेन. जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यालाच माझे प्राधान्य असेल. मुख्य लढत काँग्रेस व भाजपामध्येच असली तरी जनता दल (धर्मनिरपेक्ष) हाही रिंगणातील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष किंगमेकर ठरू शकतो.
काही बुथवर गोंधळ
आजच्या मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे वृत्त आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या जेवण, नाश्ता, तसेच चहापाण्याची काही ठिकाणी व्यवस्था नव्हती. त्यामुळे ते संतप्त झाले होते. उमेदवाराचा प्रतिनिधी हा संबंधित बुथवरील मतदारच असणे आवश्यक आहे, असे अचानक निवडणूक अधिकाºयांनी सकाळी सांगितल्याने सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची धावपळ उडाली. काही ठिकाणी मतदानयंत्रांविषयी तक्रारी होत्या. त्यामुळे मतदानात अडथळे आले.