पुरस्कारासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी वापरले AI फोटो? राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला २ कोटींचा सन्मान वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:12 IST2025-12-30T15:05:39+5:302025-12-30T15:12:46+5:30
मध्य प्रदेशात AI फोटोंचा वापर करुन पुरस्कार मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पुरस्कारासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी वापरले AI फोटो? राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला २ कोटींचा सन्मान वादाच्या भोवऱ्यात
IAS Madhya Pradesh National Water Award: मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्याला मिळालेल्या 'राष्ट्रीय जल पुरस्कारा'वरून सध्या मोठा राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. केंद्र सरकारच्या ‘जल संचय, जनभागीदारी’ मोहिमेत देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या खंडवा प्रशासनाने चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेले बनावट फोटो वापरून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार लाटल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत काँग्रेसवर फेक न्यूज पसरवल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेसचा 'स्मार्ट' भ्रष्टाचाराचा आरोप
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजप सरकारवर निशाणा साधला. "भाजपच्या राजवटीत भ्रष्टाचारही 'स्मार्ट' झाला आहे," असा टोला लगावत त्यांनी गंभीर आरोप केले. खंडवामध्ये अधिकाऱ्यांनी दोन फूट खोल खड्ड्यांना एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विहीर दाखवले आणि त्याचे फोटो पोर्टलवर अपलोड केले. याच बनावट फोटोंच्या आधारावर जिल्हा प्रशासनाने राष्ट्रपतींच्या हस्ते २ कोटी रुपयांचा पुरस्कार आणि ट्रॉफी स्वीकारली. प्रत्यक्षात जेव्हा जाऊन पाहिले, तेव्हा तिथे केवळ रिकामी मैदाने आणि शेते आढळली, जलसंधारणाचे कोणतेही काम झालेले नव्हते.
जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण
खंडवा जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता आणि जिल्हा पंचायत सीईओ नागार्जुन बी. गौडा यांनी या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने या वादातील तांत्रिक फरक स्पष्ट केला आहे. जेएसजेबी आणि सीटीआर पोर्टल वेगळे आहेत. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पुरस्कारासाठी 'जल संचय, जनभागीदारी'पोर्टलचा वापर झाला. या पोर्टलवर १,२९,०४६ कामांचे फोटो अपलोड केले होते, ज्यांची ब्लॉक आणि जिल्हा स्तरावर सखोल तपासणी झाली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने स्वतः यातील १% कामांचे प्रत्यक्ष फिल्ड व्हेरिफिकेशनही केले आहे.
जहाँ भाजपा सरकार को हमारे बच्चों को AI का सदुपयोग सिखाना चाहिए, वहीं वह खुद AI से भ्रष्टाचार कर रही है।
— Jitendra (Jitu) Patwari (@jitupatwari) December 29, 2025
खंडवा में भाजपा सरकार के अधिकारियों ने जल संरक्षण के नाम पर दो फीट के गड्ढों को AI से कुआँ बना दिया और पूरे क्षेत्र में तरह तरह के विकास कार्यों की AI से बनाई गई तस्वीरें… pic.twitter.com/ya4gLLTUmf
AI फोटोंचा घोळ नेमका कुठे?
प्रशासनाने कबूल केले की, कॅच द रेन नावाच्या दुसऱ्या एका शैक्षणिक आणि प्रेरणात्मक पोर्टलवर साधारण २० ते २१ एआयने बनवलेले फोटो अपलोड झाले होते. हे फोटो केवळ जनजागृतीसाठी होते आणि त्यांचा पुरस्काराच्या प्रक्रियेशी कोणताही संबंध नव्हता. हे फोटो चुकीच्या हेतूने कोणीतरी अपलोड केले असून, त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे सीईओ गौडा यांनी सांगितले. नागार्जुन बी. गौडा हे चर्चित असलेल्या आयएएस अधिकारी सृष्टी देशमुख यांचे पती आहेत.
१८ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खंडवा जिल्ह्याला २ कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला. जिल्ह्याला जलसंधारणात देशात प्रथम क्रमांक मिळाला असून, 'कावेश्वर' ग्रामपंचायतीलाही सर्वोत्कृष्ट पंचायतीचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये रुफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोक पिट्स, विहीर पुनर्भरण अशा १.२५ लाखांहून अधिक कामांचा समावेश होता.