‘डोनेट फॉर देश’ मोहिमेतून पक्षाला किती देणगी मिळाली? काँग्रेस नेत्याने आकडाच सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 11:00 IST2024-01-19T10:59:54+5:302024-01-19T11:00:41+5:30
Congress News: १८ डिसेंबर रोजी काँग्रेसने ‘डोनेट फॉर देश’ मोहीम सुरू केली होती.

‘डोनेट फॉर देश’ मोहिमेतून पक्षाला किती देणगी मिळाली? काँग्रेस नेत्याने आकडाच सांगितला
Congress News:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या माध्यमातून मजबूत विरोधी पक्ष करण्यावर काँग्रेस भर देत असल्याचे दिसून येत आहे. यातच काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने ‘डोनेट फॉर देश’ ही मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत एका महिन्यात काँग्रेसला किती देणगी मिळाली, याबाबत पक्षाचे नेते अजय माकन यांनी माहिती दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी निधी उभारणी मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या एका महिन्यात पक्षाला १५ कोटी रुपये मिळाले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी सांगितले की, पक्षाने १८ डिसेंबर रोजी ऑनलाइन देणगी मोहीम सुरू केली होती. गेल्या ३१ दिवसांत पक्षाला १५ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले, असे अजय माकन म्हणाले.
अजय माकन यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये अजय माकन म्हणतात की, आमच्या ‘डोनेट फॉर देश’ मोहिमेचा ३१ वा दिवस आहे. आम्ही ३ लाखांहून अधिक वैध व्यवहारांद्वारे १५ कोटी रुपये यशस्वीरित्या उभे केले आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी १८ डिसेंबर रोजी ‘डोनेट फॉर देश’ मोहीम सुरू केली आणि या अभियानाच्या पहिल्याच दिवशी पक्षाला १.३८ लाख रुपयांची देणगी दिली. काँग्रेस पक्षाच्या ५ हजार सदस्यांनी एकत्रितपणे १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
दरम्यान, ‘डोनेट फॉर देश’ मोहीम १८ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झाली. या मोहिमेद्वारे काँग्रेस पक्षाने देशातील जनतेला १३८ रुपये, १,३८० रुपये, १३,८०० रुपये किंवा त्यापेक्षा १० पट देणगी देण्याचे आवाहन केले. ही मोहीम पक्षाच्या १३८ वर्षांच्या प्रवासाचा उत्सव आहे. हा उपक्रम महात्मा गांधींच्या १९२०-२१ मधील ऐतिहासिक 'टिळक स्वराज फंड' पासून प्रेरित आहे. संसाधने आणि संधींच्या न्याय्य वितरणासह समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी पक्षाला सक्षम बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे, असे काँग्रेस पक्षाने सांगितले.