करवाढीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:30+5:302015-02-16T21:12:30+5:30

फोटो आहे...

Congress aggressive on the issue of tax increase | करवाढीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

करवाढीच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक

टो आहे...
महापौर, उपमहापौरांना घेराव : २० टक्के दरवाढीचा प्रस्ताव लांबणीवर
नागपूर : प्रस्तावित मालमत्ता करवाढीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात सोमवारी महाल येथील मनपाच्या टाऊन हॉलसमोर जोरदार निदर्शने केली. महापौर प्रवीण दटके व उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांना घेराव घातला, तसेच सभागृहातही प्रस्तावित करवाढीला विरोध दर्शविला. त्यामुळे महापौरांनी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत पुकारला नाही.
संपत्तीकरात चार नवीन कर जोडण्यात आले आहेत. यात मलजल लाभकर, पाणी लाभकर, रस्ताकर आदींचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य करात ४ ते १२ टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे मालमत्ताकरात १८ ते २० टक्के वाढ होणार आहे, सोबतच विविध स्वरूपाचे कर आकारले जाणार आहेत. या चुकीच्या करवाढीला यापुढेही काँग्रेसचा विरोध कायम राहणार असल्याचा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.
करवाढीचा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली होती. त्यामुळे विषयपत्रिकेवर असलेला हा विषय महापौरांनी पुकारला नाही. मालमत्ता कर विभागातील कर्मचारी आधीच नियमबाह्य बिलाची आकारणी करतात, नंतर तडजोड करून बिल कमी करण्याचा प्रताप या विभागात सुरू आहे. ओसीडब्ल्यू कंपनीकडूनही वारेमाप पाणी बिल आकारले जात आहे. हा प्रकार थांबविण्यात यावा, अन्यथा या विरोधात काँग्रेस रस्त्यांवर उतरेल, असा इशारा ठाक रे यांनी दिला. आंदोलनात नगरसेवक देवा उसरे, तनवीर अहमद, प्रशांत धवड, प्रेरणा कापसे, निमिषा शिर्के, रेखा बाराहाते यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
चौकट...
सभागृहात चर्चा करू
सभेत मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव पुकारला नाही. सोमवारच्या सभेत मालमत्ता करासंदर्भात दोनच विषय होते. दोन विषय आले नव्हते. त्यामुळे पुढील सभेत मालमत्ता करवाढीवर विस्तृत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. कुणाच्या दबावामुळे हा प्रस्ताव रोखलेला नाही.
प्रवीण दटके
महापौर
------
चौकट...
सत्तापक्ष सदस्यांचाही विरोध
आधीच पाणीकरात वाढ करण्यात आली आहे. त्यातच प्रस्तावित मालमत्ता करामुळे सामान्य नागरिकांवर मोठा बोजा पडणार असल्याने लोकांचा या दरवाढीला विरोध आहे. त्यामुळे सत्तापक्षातील सदस्यांचाही या दरवाढीला विरोध आहे. दरवाढीच्या मुद्यावरून सत्तापक्षातील सदस्यांत मतभेद असल्याचे चित्र आहे.

Web Title: Congress aggressive on the issue of tax increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.