दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा त्यांच्या कार्यक्रमात एका जणाने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. परंतु, पोलिसांनी त्याला पकडून कार्यक्रम स्थळापासून दूर नेले. संबंधिक व्यक्ती कोण आहे आणि कुठून आली होती, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे आधीच झेड प्लस सुरक्षा होती. आता त्यात सीआरपीएफ जवानांचाही समावेश करण्यात आला आहे.
रेखा गुप्ता हल्ल्यानंतर पहिल्यांदाच जनसुनावणीदरम्यान लोकांमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गांधी नगरमधील अशोक बाजार असोसिएशनच्या ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात त्या आल्या होत्या. त्यांची सुरक्षा पूर्वीपेक्षा खूपच वाढवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ, दिल्ली पोलिस आणि त्रिपुरा पोलीस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी डी एरिया देखील तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये डझनभर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये सुरक्षा कर्मचारी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून दूर नेताना दिसत आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे.
या दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गांधीनगरच्या लोकांसाठी १५ कोटींचा निधी जाहीर केला. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्केटच्या विकासासाठी १५ कोटी दिले. या निधीतून गांधी नगर मार्केटमधील तुटलेले रस्ते दुरुस्त केले जातील. याशिवाय, एलिव्हेटेड रोडखाली १००० वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जाईल. त्याच वेळी, आज मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे अरविंदर सिंग लवली यांची यमुनापार विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.