शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:00 IST2025-07-20T08:59:25+5:302025-07-20T09:00:08+5:30

शब्दांशिवाय भावना व्यक्त करण्याचे माध्यम असलेल्या इमोजींचा १७ जुलैला नुकताच वाढदिवस झाला.

Communication without words... Eleven years of emojis: The 'form' and 'color' that have given unspoken emotions | शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

मनोज गडनीस 
विशेष प्रतिनिधी

गुडमॉर्निंग मेसेजसाठी वापरल्या जाणाऱ्या फुलांपासून ते सहमती दर्शविणाऱ्या ठेंग्याच्या इमोजीपर्यंत आणि आपण कुठे आहोत, काय वाटते आहे इथपासून ते आपले दिवसभराचे नियोजन काय आहे हे शब्दाशिवाय व्यक्त करण्याचे माध्यम असलेल्या इमोजींचा १७ जुलैला नुकताच वाढदिवस झाला. सरत्या ११ वर्षांत इमोजींनी आपल्या भावविश्वालाच या व्यापून टाकले आहे. 

खाद्या मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी निर्माण होणाऱ्या भावनेपेक्षा कोणता इमोजी वापरावा याचा विचार आणि ते चित्र डोळ्यांसमोर आणण्याचे काम मेंदू आता अधिक जलदगतीने करतो. त्यामुळे विविध भावभावना, क्रिया, दिनचर्या, आवडी-निवडी, छंद या सर्वांना या इमोजींनी आपल्या कवेत घेतले आहे. गमतीचा भाग वाटेल पण, आता तर काही लोकांच्या चेहऱ्यावर किंवा विविध क्रियांतून, उदा. डोक्यावर हात मारणे, पळणे, नाचणे, हसणे याद्वारे हे इमोजी प्रतिबिंबित होते.


गेल्या दशकभरापासून अस्तित्वात असलेल्या इमोजीच्या वाढदिवसाची गंमत म्हणजे, इमोजीमध्ये जे कॅलेंडर आहे त्यावरील तारीख ही १७ जुलै आहे, त्या इमोजीची निर्मिती ही १७ जुलै २०१४ रोजी झाल्यामुळे तो दिवस इमोजीचा वाढदिवस म्हणून साजरा होतो. ११ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या इमोजीची कहाणी मजेशीर आहे. हजारोंच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या या इमोजींची संकल्पना सर्वप्रथम जपानमध्ये अस्तित्वात आली. शिंगटाका कुरिता या दूरसंचार क्षेत्रात कार्यरत इंजिनीयरने त्यावेळी म्हणजे १९९९ साली सर्वप्रथम याची निर्मिती करत ते त्यांच्या फोनमध्ये वापरले. जपानमध्ये इमोजींची ही संकल्पना लोकांना फारच भावली आणि त्यानंतर त्यांच्या विविध आवृत्त्या बाजारात आल्या आणि या इमोजींनी सर्वप्रथम अनेक उत्पादनांच्या मार्केटिंगचा मार्ग सुकर केला. मात्र या इमोजींना जागतिक पातळीवर मान्यतेची मोहोर उमटविण्यासाठी २०११ हे वर्ष उजाडावे लागले.


जपानमध्ये जन्माला आलेल्या इमोजीचा विस्तार करत त्याचे पालकत्व खऱ्या अर्थाने जोपासले ते जेरेमी बर्ज या ऑस्ट्रेलियन नागरिकत्व असलेल्या एका बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने. विविध भावना टिपत त्यांना इमोजीच्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या क्रियेला मूर्त रूप देण्याचे काम त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या टीमने सुमारे साडेसात हजारांपेक्षा जास्त भावभावनांना इमोजीरूपात सांधले आहे. विशेष म्हणजे हे इमोजी केवळ माहितीतून अथवा क्रिएटिव्हिटीतून जन्माला आलेत, असे नव्हे तर जगभरात घडणाऱ्या आणि जागतिक पातळीवर आपल्या परिणामांच्या पाऊलखुणा सोडणाऱ्या घटनांबद्दल निर्माण होणाऱ्या लोकभावनेचे तरंगही याच्या निर्मात्यांनी टिपले आहेत आणि तशा भावना व्यक्त करण्यासाठी ते उपलब्ध करून दिले आहेत. उदाहरणाने सांगायचे तर, मॅन्चेस्टरवरील दहशतवादी हल्ल्यानंतर दुःखी चेहऱ्याच्या इमोजीचा जन्म झाला, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही निर्णयांविरोधात उमटलेल्या रागालाही इमोजीरूपात बांधले आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक ख्रिसमस इव्हला सेलिब्रेशन करणाऱ्या आनंदी चेहऱ्याची निर्मिती होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर जसजसा वाढीस लागला तसतसे हे इमोजी या सर्व तंत्रज्ञानाचा अंगभूत घटक बनले आहेत.


जगभरात दररोज हाेताे पाच अब्ज इमोजींचा वापर
हजारो इमोजी अस्तित्वात असले तरी जगभरात ठेंगा, सौम्य हास्य, खळखळून हास्य, अश्रू, हार्ट आणि कीस या इमोजींचा वापर हा सर्वाधिक असल्याचे इमोजीपीडियावरील सर्वेक्षणातून दिसते. दररोज जगभरात पाच अब्ज एवढ्या संख्येने इमोजींचा वापर होतो. जेरेमी बर्ज यांनी साकारलेले हे इमोजी विश्व इतके प्रभावी आहे की याची दखल ॲपल, सॅमसंग, फेसबुक, गुगल यासारख्या अनेक दिग्गज ब्रँड्सना घेणे अपरिहार्य ठरले आहे.


क्रांतीला राखाडी किनारही
इमोजीमुळे काय मिळाले आणि काय गमावले, असा हिशेब मांडण्यापेक्षा अनेक लोकांच्या अव्यक्त, अमूर्त भावनांना या इमोजींमुळे मूर्त रूप मिळाले हे क्रांतीकारीच आहे. मात्र या क्रांतीला एक राखाडी किनारही असल्याचे जाणवते. 


जेव्हा सर्वप्रथम हे इमोजी प्रकटले तेव्हा ते केवळ मानवी भावना प्रतिबिंबित करत होते. मात्र कालांतराने या इमोजींचा वापर जसजसा वाढत गेला तसतसे, मानवी मनात खोलवर रुतलेल्या रंग-वर्ण भेदाच्या रंगानेही याला स्पर्श केला आणि निर्गुणावस्थेतील हे इमोजी मानवी रंग-वर्ण भेदाच्या रंगात न्हाऊन चार छटांसह अवतरले आहेत. मात्र हे उणे केले तरी ‘शब्देविणू संवादू’ साधण्याची ही किमया कोणत्या क्रांतीपेक्षा कमी नाही, हे नक्की!

Web Title: Communication without words... Eleven years of emojis: The 'form' and 'color' that have given unspoken emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.