जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:43 PM2020-08-24T12:43:27+5:302020-08-24T12:57:19+5:30

जीएसटी लागू करण्यात जेटलींची भूमिका महत्त्वाची; अर्थ मंत्रालयाकडून दिवंगत माजी अर्थमंत्र्यांच्या कार्याला उजाळा

common use items tax rates come down in the pre gst era says ministry of finance | जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

जीएसटीमुळे काय-काय झालं स्वस्त, कसा झाला फायदा?; जेटलींच्या पुण्यतिथीला अर्थखात्याने केला नफ्याचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली: भाजपाचे दिवंगत नेते अरुण जेटलींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त अर्थ मंत्रालयानं त्यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. अरुण जेटली अर्थमंत्री असताना वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. 'जीएसटी लागू करण्यात अरुण जेटलींची भूमिका महत्त्वाची होती. भारतीय कर रचनेतील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक असलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीत जेटलींचं मोठं योगदान होतं,' अशा शब्दांत अर्थ मंत्रालयानं त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अर्थ मंत्रालयानं ट्विटसोबत काही आकडेवारी दिली आहे. त्यात जीएसटी लागू होण्यापूर्वी गृहपयोगी वस्तूंवर आकारला जाणारा कर आणि आताचा आकारण्यात येणाऱ्या जीएसटीची तुलना केली आहे. केशतेल, टूथपेस्ट आणि साबण यांच्यावर आधी २९.३ टक्के इतका कर लागत होता. मात्र जीएसटी लागू झाल्यापासून आता या वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागतो, अशी आकडेवारी अर्थ मंत्रालयानं ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.




जीएसटी लागू होण्यापूर्वी देशात जवळपास १७ प्रकारचे विविध कर आकारले जात होते. मात्र १ जुलै २०१७ पासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आणि एक देश, एक कर लागू झाला. त्यात जेटलींचा मोठा वाटा होता. २०१४ मध्ये देशात भाजपाचं सरकार आल्यानंतर जेटलींकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याच कार्यकाळात जीएसटी लागू झाला. 'जीएसटीमुळे दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अनेक वस्तू स्वस्त झाल्या. याशिवाय देशातील आयकर भरणाऱ्यांची संख्यादेखील जवळपास दुप्पट होऊन १.२४ कोटींवर पोहोचली,' असं अर्थ मंत्रालयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.




जीएसटीचा सर्वसामान्यांना खूप मोठा फायदा झाल्याचं अर्थ मंत्रालयानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'जीएसटी लागू झाल्यापासून अनेक वस्तूंवरील कर कमी झाले. सध्याच्या घडीला २८ टक्के कर असलेल्या स्लॅबमध्ये केवळ अतिशय महागड्या चैनीच्या वस्तूंचा समावेश होतो. २८ टक्क्यांच्या स्लॅबमधील २३० पैकी २०० वस्तूंवरील कर कमी केला गेला आहे,' अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.

Read in English

Web Title: common use items tax rates come down in the pre gst era says ministry of finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.