चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:07 PM2019-09-26T12:07:55+5:302019-09-26T12:18:55+5:30

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

common man is suffering due to wrong economic policie implemented by pm modi says congress priyanka gandhi | चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

चूक सरकारची मात्र 'तिच्या' डोळ्यात अश्रू; प्रियंका गांधींनी व्हिडीओ पोस्ट करत साधला मोदींवर निशाणा

Next
ठळक मुद्देकाँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारची चूक आहे मात्र त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचं प्रियंका यांनी म्हटलं आहे. लोक त्रस्त झाले आहेत असं म्हणत प्रियंका यांनी एका महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर अक्षरश: रडण्याची वेळ आली. खातेदारांना या बँकेतून पुढील किमान सहा महिने एक हजार रुपयांहून अधिक रक्कम काढता येणार नाहीत. थकीत कर्जांसंबंधी चुकीची माहिती देणे आणि कर्जवाटपातील गैरव्यवहार यांमुळे हे निर्बंध आणण्यात आले आहेत. यावरूनच प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

प्रियंका गांधी यांनी बुधवारी (25 सप्टेंबर ) पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत अकाऊंट असणाऱ्या एका महिलेचा रडतानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल झाला आहे. तसेच सरकारची चूक आहे मात्र त्याचा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादल्यामुळे सर्वसामान्य बँकेतून आपले पैसे काढू शकत नाहीत. लोक त्रस्त झाले आहेत असं म्हणत प्रियंका यांनी एका महिलेचा व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे पीएमसी बँकेत खाते आहे. मेहनत करून ही महिला महिन्याला पाच हजार कमावते. कष्ट करून जमा केलेले पैसे तिने बँकेत साठवले होते. मात्र आता व्यवहार बंद झाल्याने नेमके काय करायचे हे समजत नसल्याचं सांगत आहेत. हे सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले आहेत. 

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्टमधील नियम 35 अ अंतर्गत बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेर बँकेचे ऑनलाईन व्यवहारही बंद आहेत. दरम्यान, हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल.

परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे असं म्हणत याआधीही प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला होता.  'झगमगाट दाखवून आणि रोज पाच ट्रिलियन- पाच ट्रिलियन बोलून किंवा माध्यमांच्या हेडलाईन मॅनेज केल्याने आर्थिक सुधारणा होत नाहीत. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं होतं. प्रियंका यांनी यासोबतच आणखी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये 'भाजपा सरकार मात्र या सत्याचा स्वीकार करत नाही. आर्थिक महाशक्तीच्या दिशेने जात असताना मंदीचा गतिरोधक लागला आहे. यात सुधारणा न करता झगमगाट काही कामाचा नाही' असं म्हटलं. तसेच यासोबतच मंदीकीमार हा हॅशटॅगही वापरला होता. याआधीही काही दिवसांपूर्वी प्रियंका यांनी क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. 

 

Web Title: common man is suffering due to wrong economic policie implemented by pm modi says congress priyanka gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.