कर्नल सोफिया कुरेशींचा राणी लक्ष्मीबाईंशी संबंध; आजोबांनीही सैन्यात राहून केलीय देशाची सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 13:11 IST2025-05-08T13:08:11+5:302025-05-08T13:11:04+5:30
पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांनी एका मुलाखतीमध्ये ही माहिती दिली.

कर्नल सोफिया कुरेशींचा राणी लक्ष्मीबाईंशी संबंध; आजोबांनीही सैन्यात राहून केलीय देशाची सेवा
Col Sofiya Qureshi: पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती जगासमोर उघडपणे सांगणाऱ्या भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या सामान्य योद्ध्या नाहीत. कर्नल सोफिया यांचे देशाच्या महान क्रांतिकारी राणी लक्ष्मीबाई यांच्याशीही नाते आहे. सोफिया कुरेशी यांनीच काही वर्षांपूर्वी याबाबत माहिती दिली होती. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे संपूर्ण कुटुंबच देशाच्या सेवेसाठी काम करत आलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. ६ मेच्या रात्री पाकिस्तानच्या पीओजेकेवरील ९ दहशतवादी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून उद्ध्वस्त करण्यात आले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर कर्तबगार अधिकारी अशी ओळख असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विषयी लोकांना उत्सुकता निर्माण झाली होती. त्यांच्याबाबत माहिती पुढे आल्यानंतर स्वातंत्र्यच्या काळातही त्यांच्या कुटुंबाचे योगदान असल्याचे समोर आले.
कर्नल सोफिया यांची पणजी राणी लक्ष्मीबाईंसोबत होत्या. राणी लक्ष्मीबाई यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढाई केली होती त्यावेळी माझी पणजी त्यांच्यासोबत होती असं कर्नल सोफिया यांनी सांगितले. "मी फौजी मुलगी आहे, त्यामुळे मला लष्कराच्या वातावरणाची ओळख आहे. माझे वडील सैन्यात होते, माझे आजोबा सैन्यात होते आणि माझी पणजी राणी लक्ष्मीबाईंसोबत होती. ती एक योद्धा होती. माझ्या आईला आपण (मी किंवा माझी बहीण) सैन्यात जावे असे वाटत होते. माझे आजोबा म्हणायचे की सतर्क राहणे आणि राष्ट्राचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे," असे कर्नल सोफिया म्हणाल्या.
लष्कराच्या सिग्नल कॉर्प्सशी संबंधित असलेल्या कर्नल सोफिया यांचा लष्कराशी दीर्घकाळ संबंध आहे. कर्नल सोफिया यांचे पती लष्करी अधिकारी आहेत आणि त्यांचे आजोबाही सैन्यात होते. कर्नल सोफिया यांचे पती लष्कराच्या मेकॅनाइज्ड इन्फंट्रीशी संबंधित आहेत आणि सध्या ते फ्रंटलाइनवर एका युनिटचे नेतृत्व करत आहेत.
मूळच्या गुजरातच्या असलेल्या कर्नल सोफिया २०१८ मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. पुण्यात आसियान देशांच्या सैन्यासोबत भारतीय लष्कराचा सराव झाला होता. या सरावात, कर्नल सोफिया यांना भारतीय लष्कराच्या तुकडीचे कमांडर बनवण्यात आले होते. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्धचे ऑपरेशन सिंदूर २५ मिनिटांत पूर्ण झाल्याची माहिती दिली होती.