कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:11 IST2025-11-11T17:10:50+5:302025-11-11T17:11:33+5:30
Uber Accident news: मोहालीमधील सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. एका विद्यार्थिनीने कॉलेजला जाण्यासाठी Uber कॅब बुक केली होती.

कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
प्रवाशांची सुरक्षितता आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उभे करणारी एक धक्कादायक घटना मोहाली येथे समोर आली आहे. आपल्या घरी परतण्यासाठी उबर कॅब बुक केलेल्या एका विद्यार्थिनीच्या गाडीला अपघात झाला. अपघातानंतर मदत करण्याऐवजी, ड्रायव्हरने थेट घटनास्थळावरून पळ काढला आणि जखमी मुलींना गाडीतच सोडून दिले. या संतापजनक घटनेनंतर मुलीच्या आईने लिंक्डइनवर एक भावनिक आणि कठोर पोस्ट लिहून Uber कंपनीच्या सुरक्षेच्या दाव्यांवर सडकून टीका केली आहे, जी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मोहालीमधील सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आहे. एका विद्यार्थिनीने कॉलेजला जाण्यासाठी Uber कॅब बुक केली होती. वाटेत असताना कॅबचा अपघात झाला. अपघातामुळे ड्रायव्हरच्या बाजूचा एअरबॅग उघडला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. परंतू, त्याच्या मागील सीटवर बसलेली कॉलेज युवती जखमी झाली होती. तिला तसेच अडकलेल्या अवस्थेत सोडून ड्रायव्हरने घटनास्थळावरून पोबारा केला.
ड्रायव्हरच्या या कृत्याने संतापलेल्या या तरुणीच्या आईने लिंक्डइनवर पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. त्या त्यावेळी दिल्लीला होत्या. त्यांनी तातडीने मोहाली गाठले आणि परिस्थिती पाहून उबरच्या सेवेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कॅबचा अपघात झाला असताना Uber कंपनीला अलर्ट का मिळत नाही? एकदा राईड सुरू झाल्यावर प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कोण घेतो? Uber सारखे प्लॅटफॉर्म आपली जबाबदारी टाकत असतील, तर मुलांना अनोळखींच्या भरवशावर कसे सोडायचे? असा सवाल त्यांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर देखील उबर कंपनीचा साधा फोनही आलेला नाही. गुन्हा दाखल झालेला नाही तसेच ती कॅब इच्छित स्थळी का पोहोचली नाही, याची देखील कंपनीने चौकशी केलेली नाही, असे तरुणीची आई शिल्पा यांनी म्हटले आहे.
ही पोस्ट व्हायरल होताच उबर कंपनीने मोघम उत्तर दिले आहे. ''तुमची मुलगी लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करतो. आम्ही या घटनेबद्दल अत्यंत चिंतित आहोत. एक टीम याची चौकशी करत असून तुमच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत.'', असे कंपनीने म्हटले आहे.