बेंगळुरू : कर्नाटकमध्ये दोन महिने चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामींना पायउतार व्हावे लागले होते. काँग्रेससह त्यांच्याच पक्षातील आमदारांनी सरकारविरोधात बंड पुकारत मुंबई गाठली होती. बरेच प्रयत्न करूनही या 15 आमदारांचे मन वळविण्यात जेडीएस आणि काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले होते. शेवटी कुमारस्वामींना राजीनामा द्यावा लागला होता. यामागे भाजपाचे य़ेडीयुराप्पा यांचा हात होताच, पण सिद्धरामय्यांचीही फूस असल्याची चर्चा होती.
कर्नाटकमध्ये या 15 जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार पडल्याच्या वादाने डोके वर काढले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि जेडीएसचे नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. सिद्धरामय्यांनी ट्विट करताना म्हटले की, चार दशकांच्या राजकीय अनुभवानंतरही मी गिधाडाला पोपट समजण्याची चूक केली आणि आघाडी केली. यानंतर कुमारस्वामींनी प्रत्यूत्तर देताना म्हटले की, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या संमतीने मी मुख्यमंत्री बनलो होतो. हीच गोष्ट सिद्धरामय्यांना पटली नाही, यामुळे सरकार जास्त काळ टिकले नाही.
सिद्धरामय्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितले होते की, लोकसभेनंतर एकही सेकंदासाठी कुमारस्वामींचे सरकार चालू देणार नाही, असे कुमारस्वामींना चेन्नापटनामध्ये सांगितले होते. सिद्धरामय्या यांनी राजकारण शिकविणाऱ्य़ा देवेगौडांचाच विश्वासघात केला आहे. मला नाही माहिती की सरकार का पडले, पण मी सिद्धरामय्यांचा पाळलेला पोपट नाही. रामनगरच्या लोकांनी मला सांभाळले आहे.