वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 05:42 IST2024-06-21T05:42:01+5:302024-06-21T05:42:35+5:30
या जोडप्याच्या तक्रारीची दखल घेत आयआरसीटीसीने माफी मागितली आहे.

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली!
नवी दिल्ली: आईस्क्रीममध्ये इअरबड, चिप्समध्ये बेडूक आणि विमानातील प्रवाशाच्या जेवणात ब्लेड सापडल्यानंतर आता वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. भोपाळहून आग्राला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जोडप्याने आयआरसीटीसीने दिलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा आरोप केला आहे. आता या जोडप्याच्या तक्रारीची दखल घेत आयआरसीटीसीने माफी मागितली आहे.
एक्सवर याबाबत वापरकर्त्याने या संदर्भातील तक्रार केल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला होता. तक्रार करताना म्हटले होते की, १८ जून रोजी माझे काका आणि काकी भोपाळहून आग्रा येथे जाण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करत होते. आयआरसीटीसीने दिलेल्या जेवणात त्यांना झुरळ आढळले. कृपया संबंधितांवर कठोर कारवाई करा आणि पुन्हा असे होणार नाही याची काळजी घ्या, असे या पोस्टमध्ये म्हटले होते.
दरम्यान, या पोस्टवर तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर दोन दिवसांनी याची आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली आहे. संबंधितांना दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.