cm ys jagan mohan reddy orders demolition of chandrababu naidu house praja vedika | चंद्रबाबू नायडूंच्या बंगल्यावर सरकारचा ताबा, नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाडण्याचे आदेश

चंद्रबाबू नायडूंच्या बंगल्यावर सरकारचा ताबा, नव्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाडण्याचे आदेश

नवी दिल्ली - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी अमरावतीमधील प्रजा वेदिका इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत. या इमारतीत माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू राहात होते. जगन मोहन रेड्डी यांच्या आदेशानुसार मंगळवारपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना प्रजा वेदिका इमारत विरोधी पक्षनेत्याला द्यावी अशी विनंती केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही मागणी धुडकावून लावली होती.

राज्य सरकारने शनिवारी चंद्रबाबू नायडू याचा अमरावती येथील प्रजा वेदिका बंगला ताब्यात घेतला होता. त्यानंतर टीडीपीने याला द्वेषाचे राजकारण म्हटले होते. विरोधकांचा आरोप आहे की, सरकारने माजी मुख्यमंत्र्यांविषयी सद्भावना दाखवली नाही. तसेच त्यांचे सामान घराच्या बाहेर फेकून दिले.


टीडीपी सरकारने प्रजा वेदिका इमारतीची निर्मिती आंध्रप्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून करण्यात आले होती. पाच कोटी रुपये खर्चून निर्माण केलेल्या प्रजा वेदिका बंगल्यातून चंद्रबाबू नायडू कार्यालयीन कामकाजासह पक्षाचे काम देखील पाहात होते. या महिन्याच्या सुरुवातीला नायडू यांनी ही इमारत विरोधीपक्ष नेत्याला द्यावी ही विनंती केली होती. मात्र सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली.

दुसरीकडे अनेकांच्या मते इमारत चांगली असेल तर पाडण्यापेक्षा इतर कामासाठी त्याचा उपयोग व्हावा. मात्र जगन मोहन सरकारने इमारत पाडण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: cm ys jagan mohan reddy orders demolition of chandrababu naidu house praja vedika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.