"ममता दीदींची पंतप्रधान मोदींसोबत डील, काँग्रेसवर हल्ला चढवून खूश केलं!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:44 IST2023-03-20T16:43:44+5:302023-03-20T16:44:58+5:30
"ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डील झाली असून, त्या केवळ पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करत आहेत."

"ममता दीदींची पंतप्रधान मोदींसोबत डील, काँग्रेसवर हल्ला चढवून खूश केलं!"
राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीआरपी आहेत, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. यानंतर काँग्रेसचा चांगलाच तिळपापड झाला आहे. "भाजपच राहुल गांधींना चर्चेत आणत आहे. जोवर राहुल गांधी विरोधी पक्षनेते पदावर राहतील, तोवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणे कठीण आहे," असे मुख्यमंत्री ममता यांनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी, ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डील झाली असून, त्या केवळ पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे म्हटले आहे.
अधीर रंजन चौधरी म्हणाले, राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात डील झाली आहे. एएनआयसोबत बोलताना चौधरी म्हणाले, 'ममता बॅनर्जी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर बोलत आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी पीएम मोदी आणि दीदी यांच्यात डील झाली आहे. एवढेच नाही, तर ममता बॅनर्जींना ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांपासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे. त्यामुळेच त्या आता काँग्रेसविरोधात बोलत आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूश होतील.
तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी रविवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात टीएमसी कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित केले. राहुल गांधींचे नाव घेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवरही निशाणा साधला. “भाजपला संसद चालवायची नाही. त्यांना राहुल गांधींना नेता बनवायचे आहे. नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा टीआरपी राहुल गांधी आहेत. त्यांनी परदेशात केलेल्या वक्तव्याला मुद्दा बनविले जात आहे.
याच बरोबर, “संसदेतील कामकाज सुरू राहावे आणि अदानी प्रकरणावर चर्चा व्हावी, एलआयसीवर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. अदानींबाबत चर्चा का होत नाही. एलआयसीवर चर्चा का होत नाही. गॅसच्या किमतीबाबत चर्चा का केल्या जात नाहीत," असे प्रश्नही ममता यांनी उपस्थित केले.