"भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री आहेत, ते पंजाबसाठी नव्हे तर केजरीवालांसाठी काम करतात", सुखबीर बादल यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 18:43 IST2023-10-15T18:42:27+5:302023-10-15T18:43:12+5:30
पंजाबमध्ये विकास ठप्प झाला आहे. येथे कोणतेही मोठे काम होत नाही, असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे.

"भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री आहेत, ते पंजाबसाठी नव्हे तर केजरीवालांसाठी काम करतात", सुखबीर बादल यांचा आरोप
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विरोधी पक्षांना एसवायएल सर्वेक्षणसह राज्यातील सर्व मुद्द्यांवर खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. यावरून शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी भगवंत मान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज भगवंत मान यांच्या सरकारच्या कार्यकाळात पंजाब मागे जात आहे. पंजाबमध्ये विकास ठप्प झाला आहे. येथे कोणतेही मोठे काम होत नाही, असे सुखबीर सिंग बादल यांनी म्हटले आहे.
लुधियानामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सुखबीर सिंग बादल म्हणाले की, सध्या हे सरकार पंजाबच्या हिताचे कोणतेही काम करत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जे हवे आहे आणि जे त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या हिताचे आहे, त्यानुसार भगवंत मान काम करतात. आजपर्यंत अरविंद केजरीवाल हेच पंजाबचे खरे मुख्यमंत्री आहेत, भगवंत मान यांना केवळ नावाने खुर्चीवर बसवण्यात आले आहे. भगवंत मान हे बनावट मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या विधानांना प्राधान्य देता येणार नाही, असे सांगत सुखबीर सिंग बादल यांनी भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला.
सुखबीर सिंह बादल म्हणाले की, एकीकडे पंजाब सरकार एसवायएलचे सर्वेक्षण करण्यासाठी पंजाबमध्ये येणाऱ्या टीमला विरोध करणार असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे पंजाब सरकारच्या पोर्टलवर एसवायएलचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा विरोधाभास का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, यावेळी पत्रकारांनी सुखबीर सिंग बादल यांना मुख्यमंत्री भगवंत मान यांनी खुल्या चर्चेबाबत दिलेल्या आव्हानाबाबत विचारले असता, ते म्हणाले की, चर्चा खर्या मुख्यमंत्र्यांशी होईल, कारण खरे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवान हे डमी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी चर्चा करून काय उपयोग? असा सवाल सुखबीर सिंग बादल यांनी केला.