श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमधील नैसर्गिक आपत्तीची घटना ताजी असताना कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी झाल्याने हाहाकार उडाला. ढगफुटी व भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच चिमुकल्यांसह चार कुटुंबातील सात लोकांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री झालेली ढगफुटी व अतिमुसळसार पावसाने राजबागलगतच्या जोध घाटी व जंगलोट क्षेत्रातील जनजीवन ठप्प झाले असून, जम्मू-पठाणकोट रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बागरा गावात भूस्खलन झाल्याने एक महिला व तिच्या मुलीचा मृत्यू झाला. बचाव अभियानानंतर सुरक्षा दलाने जोध खोऱ्यातील सहा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ढगफुटीत सुरमुद्दीन (३२) त्यांची दोन मुले फानू (६) व शेदू (५) यांच्यासह पाच जणांचा, तर जंगलोटमधील भूस्खलनात रेणू देवी (३९) व त्यांची मुलगी राधिकाचा (९) मृत्यू झाला.
हेलिकॉप्टरची मदत
ढगफुटीमुळे जोध घाटीकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने मदत व बचाव अभियानासाठी सुरक्षा दलाला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागत आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत. अभियानादरम्यान १५ लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आहे.
किश्तवाड : चौथ्या दिवशी मदत अभियान सुरूच
किश्तवाडमधील चिशोती गावात १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाला असून, ८० जण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी रविवारी चौथ्या दिवशीदेखील बचाव अभियान सुरू होते. बचाव अभियानादरम्यान आतापर्यंत १६७ लोकांना वाचवण्यात यश आले.