ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 06:56 IST2025-08-06T06:54:08+5:302025-08-06T06:56:10+5:30

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये मोठे नुकसान; लष्करी छावणीही वाहून गेली...

Cloudburst causes flood; many people, houses washed away; soldiers deployed for rescue operations | ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धरालीमध्ये ढगफुटीमुळे जवळील खीरगंगा नदीला आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने प्रचंड नुकसान झाले असून, अनेक लोक बेपत्ता आहेत. या पुरात २० ते २५ हॉटेल व होम स्टे वाहून गेल्याचे वृत्त आहे. प्रारंभिक आकडेवारीनुसार चौघांचा मृत्यू झाला असल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी या भागातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की मनुष्यहानी किंवा वित्तहानीची आकडेवारी इतक्यात स्पष्ट होणे शक्य नाही.

या आपत्तीमध्ये मृतांचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी प्रचंड मनुष्यहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. कारण, या भागात हॉटेल आणि होम स्टेमध्ये राहणाऱ्यांची संख्या खूप असते. त्यामुळे नेमके किती लोक पुरात व चिखलात दबले गेले आहेत हे कळणे तूर्त अशक्य असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.

गंगोत्री यात्रा मार्गावरील प्रमुख ठिकाण असलेल्या धरालीमध्ये अनेक हॉटेल्स व होम स्टेमध्ये यात्रेकरूंची वर्दळ असते. मंगळवारी नदीच्या पाणलोट क्षेत्रातच ढगफुटी झाल्याने अचानक महापूर आला. यात वाहून आलेली माती व दगड-खडीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले गेले.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये जागोजागी डोंगरी भागात पावसामुळे गंगोत्री मार्गावर डोंगरांवरून वाहून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे रस्ते जाम झाले आहेत. अनेक भागांत मदत व बचाव पथकेच अडकून पडली आहेत. हर्षिल भागात हेलिपॅड वाहून गेले असून, लष्कराची छावणीही पाण्यात गेली आहे.

या ठिकाणी आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. बचाव पथके, लष्कर देखील सतत बचाव कार्य करत आहे. आतापर्यंत १३० हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे.

अचानक पाण्याचा-दगडांचा आवाज आला अन्...
मुखबा गावचे प्रत्यक्षदर्शी सुभाषचंद्र सेमवाल सांगतात, दुपारी आम्ही घरात विश्रांती घेत असताना अचानक पाण्याचा खळखळाट आणि दगडांचे आवाज ऐकू आले. काही कळायच्या हॉटेल आणि इमारती या पाण्याचे कवेत घेतल्या.
हे पाणी धरालीच्या दिशेने येत असल्याचे दिसताच आम्ही लोकांना सावध करण्यासाठी शिट्या वाजवणे सुरू केले, ओरडून या लोकांना लांब जाण्यास सांगितले. काही लोक हॉटेलमधून बाहेर पडून पळाले. परंतु, पाहता पाहता कित्येक घरे, लोक पुरात वाहून गेले.

आठ ते १० जवान बेपत्ता?
या घटनेत हर्शिल भागातील छावणी परिसरातून भारतीय लष्कराचे आठ ते १० जवान बेपत्ता असल्याचे समजते. लष्कराचे जवान बेपत्ता झालेले असतानाही, लष्कराचे इतर जवान लोकांसाठी मदत-बचाव कार्य करण्यास सरसावले आहेत, असे भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वपक्षीय आवाहन...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, यात दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांबाबत संवेदना व्यक्त केली आहे. शाह यांनी या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेऊन मदतीचे आदेश दिले.

‘त्या’ भयंकर आठवणी...
१६ जून २०१३ रोजी रात्री केदारनाथमध्ये आलेल्या अशाच आपत्तीत बेपत्ता ३०७५ लोकांचा आजही थांगपत्ता लागलेला नाही. याशिवाय ७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी साडेदहा वा. ऋषिगंगा नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे विद्युत प्रकल्पाच्या कामाचे प्रचंड नुकसान झाले. 
या आपत्तीमध्ये बोगद्यात अडकलेले ११७ मृतदेह सापडले. परंतु, अजूनही ८९ जणांचे मृतदेह सापडू शकले नाही. उत्तराखंडमधील मंगळवारच्या आपत्तीमुळे या भयंकर आठवणी ताज्या झाल्या.
 

Web Title: Cloudburst causes flood; many people, houses washed away; soldiers deployed for rescue operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.