संपामुळे ७५ टक्के कोळसा उत्पादन बंद
By Admin | Updated: January 7, 2015 23:29 IST2015-01-07T23:29:56+5:302015-01-07T23:29:56+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कामगारांच्या संपामुळे ७५ टक्के उत्पादनावर बुधवारी परिणाम झाला

संपामुळे ७५ टक्के कोळसा उत्पादन बंद
नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कामगारांच्या संपामुळे ७५ टक्के उत्पादनावर बुधवारी परिणाम झाला. मंगळवारपासून सुरू झालेल्या या संपाचा थेट परिणाम वीजनिर्मितीवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
संपात कोळसा आणि वीजमंत्री पीयूष गोयल यांनी हस्तक्षेप करायचा निर्णय घेतला व त्यामुळे संपकरी कामगार व सरकार यांच्यात चर्चा सुरू झाली. झारखंडमध्ये संपकरी कामगार आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे.
कोल इंडिया लिमिटेडच्या ४३८ पैकी २९० खाणी संपामुळे बंद पडल्या आहेत. हा संप म्हणजे गेल्या ४० वर्षांतील सर्वांत मोठा औद्योगिक संप असल्याचे मानले जाते. देशातील अन्य कोळसा खाणींमधील उत्पादनावरही परिणाम झाला आहे. या संपामुळे देशातील १०० पेक्षा जास्त वीजनिर्मिती केंद्रांच्या कोळसापुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
आणीबाणीतील कोळसा साठाही फार दिवस पुरणार नाही. संप दीर्घकाळ राहिला तर आमच्याकडे वीज संकट निर्माण होईल, अशी भीती उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशने व्यक्त केली आहे.
संपामुळे बंद पडलेल्या २९० खाणींमधून कोळसा काढण्यासाठी व्यवस्थापन तात्पुरते कामगार आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. मंगळवारी चर्चा अपयशी ठरल्यानंतर संघटनेच्या नेत्यांनी चर्चेसाठी राजकीय नेतृत्वाने आले पाहिजे असे म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४सरकारने बळाचा वापर केल्यास संप हाताबाहेर जाऊ शकतो, असा इशारा इंडियन नॅशनल माईन वर्कर्स फेडरेशनचे (इंटक) अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी दिला आहे. दरम्यान, भाकपने (मार्क्सवादी) या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे.
४कामगारांनी संपासाठी जी एकजूट दाखविली त्याचे भाकपने स्वागत केले आहे. सरकारचा प्रयत्न खाणींचे राष्ट्रीयीकरण रद्द करण्याचा असल्यामुळे यासंदर्भातील अध्यादेश मागे घेण्यात यावा, अशी मागणीही पक्षाने केली आहे.
४पाच लाख खाण कामगार संपावर असून रोजचे दीड दशलक्ष टन कोळसा उत्पादन बंद पडले आहे. उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे कोल इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले.