माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 15:37 IST2019-12-22T14:57:33+5:302019-12-22T15:37:35+5:30

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदींचं विरोधकांवर शरसंधान

Citizenship amendment act gives citizenship doesnt snatch it says pm modi | माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

माझ्या पुतळ्याला जोडे मारा; पण गरिबांची वाहनं जाळू नका; मोदींचं आवाहन

नवी दिल्ली: माझ्या पुतळ्याला जोडे मारा. मला हव्या तितक्या शिव्या द्या. पण देशातील गरिबांच्या गाड्या जाळू नका. त्यामधून तुम्हाला काय मिळणार, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलन करणाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात सुरू असलेल्या आंदोलनांवर मोदींनी दिल्लीतील रामलीला मैदानातून भाष्य केलं. नवा कायदा कोणाचं नागरिकत्व रद्द करण्यासाठी नव्हे, तर नागरिकत्व देण्यासाठी आणला गेला आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं. 

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवं आयुष्य मिळेल, असं मोदी म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याची  अंमलबजावणी करून पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडं पाडण्याची संधी आपल्या हातात होती. त्यांच्या देशात अल्पसंख्यांकावर सुरू असलेले अत्याचार जगासमोर नेण्याची संधी होती. मात्र विरोधकांनी ती वाया घालवली. कारण त्यांना देश नव्हे तर पक्ष महत्त्वाचा वाटतो, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 




सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात आंदोलनं सुरू असताना काँग्रेसचे नेते शांततेचं आवाहन करत नाहीत. याचा अर्थ त्यांची आंदोलनातील हिंसेला मूकसंमती आहे. सार्वजनिक मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत मोदींना काँग्रेसवर तोफ डागली. आंदोलनातील हिंसाचारातून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. करदात्यांचा पैसा वाया घालवला जात आहे. पण यातून काय साधलं जाणार, गरिबांची वाहनं जाळून काय मिळणार, असे प्रश्न मोदींनी विचारले. तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असल्यास माझे पुतळे जाळा, त्याला जोडे मारा, असं मोदी म्हणाले. 




मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला महात्मा गांधींची आठवण करुन दिली. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना असुरक्षित वाटल्यास, त्यांच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना सन्मानानं भारतात घ्या, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. काँग्रेसला माझं ऐकायचं नसेल, पण त्यांनी किमान गांधींनी सांगितलेली गोष्ट तरी ऐकावी, असं मोदी म्हणाले. शेजारील देशांमधील अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व देण्याची भूमिका मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना मांडली होती. मग आम्ही त्यापेक्षा काय वेगळं करतोय?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. 




राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही मोदींनी काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेतला. एनआरसीचा विषय ना संसदेत आलाय ना मंत्रिमंडळात, तरीही यावरुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरुन आम्ही आसाममध्ये एनआरसीची अंमलबजावणी केली. मात्र तरीही या मुद्द्यावरुन जनतेच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करण्याचं विरोधकांकडून केलं जात आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 

Web Title: Citizenship amendment act gives citizenship doesnt snatch it says pm modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.