Citizenship Amendment Act to be enacted soon, BJP President J.P. Nadda gave a clear signal | लवकरच लागू होणार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले स्पष्ट संकेत

लवकरच लागू होणार नागरिकत्व दुरुस्ती कायदा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिले स्पष्ट संकेत

ठळक मुद्देनागरिकत्व दुरुस्ती कायदा मिळणे निश्चित आहेकोरोनामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्याजसजसा कोरोना कमी होत आहे. तसतसे नियम बनत आहेत. त्यामुळे सीएए मिळेल हे निश्चित

कोलकाता - केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशातील राजकीय आणि सामाजिक विश्व ढवळून निघाले होते. पण मार्चमध्ये देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे हा विषय काहीसा मागे पडला होता. दरम्यान, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट संकेत दिले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लवकरच लागू होईल, असे नड्डा यांनी आज पश्चिम बंगालमध्ये सांगितले. तसेच राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबले जात असल्याचाही आरोप केला.

भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आले होते. यावेळी त्यांनी २०२१ मध्ये प्रस्तावित असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीची पाहणी केली. तसेच विविध गटातील व्यक्तींशी चर्चा केली.

यावेळी नड्डा म्हणाले की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण आहे. तर अन्य राजकीय पक्ष मात्र फूट पाडा, समाजाची विभागणी करा, वेगवेगळे करा, वेगवेगळ्या मागण्या करा आणि राज्य करा या धोरणावर चालतात. पश्चिम बंगालमधील सध्याचे सरकारही हेच करत आहे. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे. भाजपा समाजाला जोडण्याचे काम करतो. मात्र इतर पक्ष समाजाला तोडून व्होटबँकेचे राजकारण करतात.

यावेळी नड्डा यांनी केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी न केल्याबद्दल ममता सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होताच केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी आणि आयुष्मान भारत सारख्या योजना राज्यात लागू केल्या जातील. ममता बॅनर्जी यांनी किसान सन्मान निधी योजना राज्यात लागू न करणे ही दु:खद बाब आहे. त्यांनी राज्यातील ७६ लाख शेतकऱ्यांना या योनेपासून वंचित ठेवले आहे. त्याबरोबर आयुष्मान भारतही राज्यात लागू होईल.

तसेच सीएएची अंमलबजावणीसुद्धा राज्यात होईल असे नड्डा यांनी सांगितले. ते म्हणाले तुम्हाला नागरिकत्व दुरुस्ती कायदा मिळेल. तो मिळणे निश्चित आहे. सध्या या कायद्याचे नियम बनत आहेत. कोरोनामुळे या कायद्याच्या अंमलबजावणीत काही अडचणी आल्या. मात्र जसजसा कोरोना कमी होत आहे. तसतसे नियम बनत आहेत. त्यामुळे सीएए मिळेल हे निश्चित आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Citizenship Amendment Act to be enacted soon, BJP President J.P. Nadda gave a clear signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.