Chirag Paswan on Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, एनडीए 200 च्या आसपास जागा मिळवताना दिसत आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयावर लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे प्रमुख चिराग पासवान यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. बिहारच्या मतदारांनी विकासाच्या अजेंड्याला आणि डबल इंजिन सरकारवरील विश्वासाला पुन्हा एकदा अधिक बळ दिल्याचे चिराग म्हणाले.
दरम्यान, या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपचा 90+ जागांवर विजय होतोय, तर नितीश कुमारांच्या जदयूला 82-83 जागा मिळत आहेत. अशा परिस्थितीत, भाजप नितीश कुमारांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्यास पाठिंबा देईल का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय. या सर्व चर्चेदरम्यान, चिराग पासवान यांनी नितीश कुमारांबद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील
माध्यमांशी संवाद साधताना चिराग पासवान म्हणाले की, "एनडीएला मिळत असलेले जबरदस्त बहुमत हे दाखवते की, बिहार विकासाच्या मार्गावर पुढे जाऊ इच्छिते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा अनुभव या दोन्हीमुळे पुढील पाच वर्षांत बिहार आणखी गतीने प्रगती करेल. बर्याच जणांनी दावा केला होता की, एलजेपी (रामविलास) आपली जागा टिकवू शकणार नाही किंवा त्यांना मतदार प्रतिसाद देणार नाही; परंतु मतदारांनी सर्व अंदाज चुकीचे ठरवले."
"यावेळीही मला कोणत्याही सर्वेक्षण किंवा एक्झिट पोलवर नाही, तर स्वतःवर विश्वास होता. स्ट्राइक रेटवर मी अनेक टोमणे मारताना पाहिले आहेत. पण, यंदा युतीचा स्ट्राइक रेट अतिशय सुंदर राहिला आहे. बिहारच्या जनतेने मला कमी लेखण्याची चूक करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले. या विजयासह नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, मला यावर पूर्ण विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आता यावर भाजप काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
विरोधकांना धक्का
आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, एनडीए 200 जागा मिळवताना दिसत आहेत. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांचा आरजेडी 25, तर काँग्रेसला फक्त 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे. इतर पक्षांबद्दल बोलायचे झाले तर, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज आणि मुकेश सहनी यांच्या व्हीआयपीला शुन्य जागा मिळाल्या आहेत. ओवैसींचा एआयएमआयएम आणि डाव्यांनी मात्र काही ठिकाणी आघाडी घेतली आहे. येत्या काही वेळात अंतिम निकाल जाहीर होईल.
Web Summary : Chirag Paswan expressed confidence that Nitish Kumar will become Chief Minister again, citing NDA's victory reflecting faith in development. He highlighted BJP's strong performance and dismissed doubts about his party's impact, crediting voters for proving critics wrong.
Web Summary : चिराग पासवान ने विश्वास जताया कि नीतीश कुमार फिर से मुख्यमंत्री बनेंगे, एनडीए की जीत को विकास में विश्वास का प्रतिबिंब बताया। उन्होंने बीजेपी के मजबूत प्रदर्शन पर प्रकाश डाला और अपनी पार्टी के प्रभाव पर संदेहों को खारिज कर दिया, मतदाताओं को आलोचकों को गलत साबित करने का श्रेय दिया।