Chirag Paswan : "याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:49 IST2024-12-19T16:48:24+5:302024-12-19T16:49:31+5:30
Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Chirag Paswan : "याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी..."; संसदेतील धक्काबुक्कीवर चिराग पासवान संतापले
संसदेत झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकशाही आणि संसदेच्या प्रतिष्ठेसाठी लाजिरवाणा दिवस असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपा खासदारांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
चिराग पासवान म्हणाले, "आजचा दिवस लोकशाही आणि संसदेच्या प्रतिष्ठेसाठी लाजिरवाणा दिवस होता. राहुल गांधी यांनी भाजपा खासदारांना ज्या प्रकारे धक्काबुक्की केली त्याला अहंकार म्हणायचं की गुंडगिरी... तिथे ज्येष्ठ खासदार होते, त्यांना ढकलण्यात आलं. दोन खासदार रुग्णालयात आहेत, राज्यसभा खासदार कोन्याकजी यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, अशा प्रकारची वागणूक तुमचा अहंकार दर्शवते, हे अजिबात योग्य नाही."
राहुल गांधी यांनी प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत या दोन खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राहुल गांधींनी एका खासदाराला धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपा खासदार प्रताप सारंगी यांनी देखील केला. एका व्हिडिओमध्ये भाजपा खासदार निशिकांत दुबे हे काँग्रेस नेते राहुल गांधींना सांगत आहेत की तुम्ही गुंडगिरी करत आहात.
"मला संसदेत जाण्यापासून रोखत होते..."; राहुल गांधींचं स्पष्टीकरण
राहुल गांधींनी धक्काबुक्कीवर स्पष्टीकरण दिलं आहे. आम्हाला आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आणि तिथे धक्काबुक्की केल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, आम्ही मकरद्वारमधून संसदेच्या आत जात होतो. भाजपाचे लोक तिथे उभे होते आणि आम्हाला आत जाण्यापासून रोखत होते. घटनास्थळी धक्काबुक्की होऊ लागले आणि लोक खाली पडले. हे लोक संविधानावर आक्रमण करून आंबेडकरांचा अपमान करत आहेत. मुख्य मुद्दा म्हणजे ते संविधानावर आक्रमण करत आहेत.